Friday, 13 Dec, 5.09 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
आयसीसीच्या टी२०रँकिंगमध्ये टीम इंडियाचे हे तीन क्रिकेटपटू पहिल्या १०मध्ये

बुधवारी (11 डिसेंबर) वानखेडे स्टेडियम, मुंबई (Wankhede Stadium, Mumbai) येथे 3 सामन्यांच्या टी20 (3 Matches Of T20 Series) मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना भारत विरुद्ध विंडीज (India vs Windies) संघात पार पडला. या सामन्यात भारताने 67 धावांनी विजय मिळवत मालिका 2-1 ने खिशात घातली.

त्याचबरोबर, या सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही (Virat Kohli) या टी20 मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे नुकत्याच जाहीर झालेल्या टी20 क्रमवारीमधील पहिल्या 10 फलंदाजांच्या यादीमध्ये विराटचा समावेश झाला आहे.

पाच स्थानांची झेप घेत विराट दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्याकडे 685 गुण आहेत. विराट व्यतिरिक्त या क्रमवारीमध्ये केएल राहुलला (KL Rahul) तीन स्थानांचा फायदा झाला असून तो 734 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माची मात्र एक स्थानाची घसरण होऊन तो नवव्या क्रमांकावर आला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत विराटने एकूण 183 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने दोन अर्धशतकेही केली आहेत. कोहलीने मालिकेच्या अखेरच्या सामन्यात 29 चेंडूत 70 आणि दुसर्‍या सामन्यात 50 चेंडूत 94 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केल्या होत्या.

विराटसाठी हे वर्ष उत्तम राहिले. तो वनडे आणि कसोटी क्रमवारीतही अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे.

या टी20 क्रमवारीमध्ये भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने 15 स्थानांनी झेप घेत 74 व्या क्रमांक मिळवला आहे. त्याचबरोबर गोलंदाजांच्या क्रमवारीत वॉशिंग्टन सुंदर 19 स्थानांनी वर येत 14 व्या क्रमांकावर आणि दीपक चहर 22 स्थानांनी पुढे येत 21 व्या क्रमांकावर आले आहेत.

वेस्ट इंडीजकडून कायरन पोलार्ड 106 व्या स्थानावरुन 79 व्या क्रमांकावर आला आहे. मुंबईत झालेल्या अंतिम सामन्याच्या लढतीनंतर निकोलस पूरण 96 व्या स्थानावरून 83 व्या क्रमांकावर आला आहे. शिमरॉन हेटमायर या क्रमवारीत 104 क्रमांकावर पोहोचला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top