नवे लेख
बेअरस्टोने केली 'जादू'! चालू सामन्यात लाल चेंडूला बनवले पांढरे

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंड संघाने यजमान श्रीलंकेला 'व्हाईटवॉश' दिला. दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या डावात श्रीलंकेने इंग्लंडला दिलेल्या १६४ धावांचा इंग्लंडने यशस्वी पाठलाग केला. युवा डॉम सिबली व अनुभवी यष्टीरक्षक जोस बटलर यांनी चमकदार कामगिरी करत इंग्लंडला ६ गड्यांनी विजय मिळवून दिला. मात्र, इंग्लंडच्या दुसऱ्या डावात एक गमतीदार घटना पाहण्यास मिळाली. कसोटी पाहण्यासाठी वापरला जाणारा चेंडू अचानकपणे पांढरा झाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
लाल चेंडू झाला पांढरा
श्रीलंकेने दिलेल्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर झॅक क्राऊली लवकर बाद झाला. त्यानंतर अनुभवी जॉनी बेअरस्टोने आक्रमक रूप धारण करत श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. बेअरस्टोने २८ चेंडूत २९ धावांची वेगवान खेळी केली. या खेळी दरम्यान बेअरस्टोने मारलेल्या एका षटकाराने लाल चेंडूचा रंग बदलून पांढरा झाला.
त्याचे झाले असे की, इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील दहाव्या षटकात श्रीलंकेचा रमेश मेंडिस गोलंदाजीसाठी आला. फलंदाजी करत असलेल्या बेअरस्टोने पहिला चेंडू सीमारेषेपार भिरकावत षटकार वसूल केला. मात्र, हा चेंडू जाऊन सरळ पांढरा रंग ठेवलेल्या बादलीत पडला. त्यामुळे लाल चेंडू अचानकपणे पांढरा झाला. त्यानंतर, पंचांनी हा चेंडू बदलत नवीन चेंडू घेतला.
संपूर्ण मालिकेत चर्चेत राहिला बेअरस्टो
इंग्लंडचा सलामीवीर व प्रमुख अनुभवी खेळाडू असलेला बेअरस्टो या मालिकेत चांगलाच चर्चेत राहिला आहे. या षटकाराव्यतिरिक्त स्लेजिंगमुळे तो चर्चेत आला होता. श्रीलंकेचा यष्टीरक्षक निरोशन डिकवेला याने पहिल्या डावात बेअरस्टोला भारत दौऱ्यावर निवडला न गेल्याने स्लेज केले होते. तसेच, बेअरस्टोने श्रीलंकेच्या दिनेश चंडीमलची एकाग्रता भंग करताना "कम ऑन चंडीमल, तू स्वतःची विकेट फेक" असे म्हटलेले. त्यानंतर चंडीमल पुढील चेंडूवर बाद झाला होता.
महत्वाच्या बातम्या:
SL vs ENG : दुसर्या कसोटी सामन्यातही श्रीलंकेचा धुव्वा, इंग्लंडचे मालिकेत निर्भेळ यश
रिषभ पंतला अजूनही वाटते त्या पराभवाची खंत, म्हणाला
एका खेळीने दिग्गजांच्या मांदियाळीत सामील झाला रूट, केली ही विक्रमी कामगिरी