Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारताचा श्रीलंका दौरा ठरला! कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या सर्व माहिती

भारताचा श्रीलंका दौरा ठरला! कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या सर्व माहिती

भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ ऑगस्टमध्ये श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका सध्या सुरू असलेल्या आयसीसी कसोटी जागतिक अजिंक्यपद २०२५ - २७ चा भाग असणार आहे.

या स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत पाचव्या तर श्रीलंका सहाव्या स्थानावर आहे.

या मालिकेतील पहिला कसोटी सामना १५ ते १९ ऑगस्टमध्ये गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आणि दुसरा सामना २३ ते २७ ऑगस्ट दरम्यान कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे. हे दोन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. २०१७ नंतर प्रथमच भारत श्रीलंकेत कसोटी मालिका खेळणार आहे.

जेव्हा भारताने २०१७ मध्ये श्रीलंका दौरा केला होता, तेव्हा खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत ३-० असा विजय मिळवला होता. त्यानंतर दोनदा श्रीलंका संघ कसोटी मालिका खेळण्यास भारत दौऱ्यावर आला होता.

आता ऑगस्टमध्ये जो दौरा होणार आहे, त्यामध्ये दोन्ही क्रिकेट बोर्डांनी तीन टी२० सामन्यांच्या समाविष्टाबाबत चर्चा केली होती, मात्र श्रीलंका क्रिकेटच्या प्रसिद्धीपत्रकात त्याचा उल्लेख नाही.

दोनदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारा भारताला एकदाही विजेतेपद जिंकता आलेले नाही. आता ते या स्पर्धेच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी असून अंतिम दोन संघांमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी उर्वरित सामन्यांमध्ये केलेली एक चूकही महागात पडेल. त्यामुळे भारताला आगामी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत जिंकावे लागणार आहेत.

सध्या भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीची सुरूवात इंग्लंडमध्ये २-२ अशी उत्तम केली. त्यानंतर मायदेशाच वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत विजय मिळवला. धमाकेदार सुरूवात झाल्यानंतर मात्र मायदेशात दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेल्या धक्कादायक व्हाईटवॉशमुळे संघाची गती संथ झाली आहे.

श्रीलंका दौऱ्यात चांगली कामगिरी करण्याचा दबाव खेळाडूंबरोबर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावरही असणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports