भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा सध्या त्याच्या राष्ट्रीय संघांतील पुनरागमनामुळे चर्चेचा विषय बनला आहे. त्याने भारतासाठी शेवटचा सामना 2022 मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला राष्ट्रीय संघात संधी मिळाली नाही, मात्र त्याने निराश न होता सातत्याने देशांतर्गत स्पर्धा आणि आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी केली.
त्याची लक्षवेधी कामगिरी पाहून क्रिकेट पंडितांनी त्याला भारतासाठी खेळण्यास आणखी एक संधी दिली जावे, अशी अपेक्षा केली आहे.
दिग्गज फिरकीपटू आर अश्विन यानेही भुवनेश्वरला आगामी आयसीसी वनडे विश्वचषकासाठी संधी दिली जावी, असे मत व्यक्त केले आहे. त्याने त्याच्या संभाव्य विश्वचषक संघात भुवनेश्वरचा समावेश केला आहे. त्याच्या मते, दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीत भारताला त्याच्या अनुभवाची आवश्यकता भासेल. अनेकांनी भुवनेश्वरला वनडे विश्वचषकाच्या संघात घेण्याबाबत आपापले मत व्यक्त केले आहे. आता खुद्द भुवनेश्वरनेच त्याची प्रतिक्रिया व्यक्त करताना संघातील पुनरागमनाबाबत मौन सोडले आहे.
भुवनेश्वरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB)पॉडकास्टमध्ये सांगितले, "मी पूर्णपणे समाधानी आणि शांत आहे आणि याचे श्रेय मी माझ्या कुटुंबाला देतो. आमच्या घरी आम्ही कधीच क्रिकेटबद्दल चर्चा करत नाही. मी पुन्हा भारतीय संघात कधी येईन, माझी निवड का झाली नाही किंवा नक्की काय चुकले, यावर आम्ही कधीच बोलत नाही. या गोष्टीचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यामुळेच मला कोणतीही खंत वाटत नाही. जेव्हा तुम्ही संघाचे मुख्य सदस्य असता, तेव्हा सगळेच म्हणतात की 'संघ सर्वात महत्त्वाचा आहे'. पण जेव्हा तुम्ही संघात नसता, तेव्हा साहजिकच तुम्हाला असे वाटू शकते की, 'कदाचित मी तिथे असायला हवे होते.'"
भुवनेश्वरने पुढे म्हणाला, "बदल हा खेळाचाच एक भाग आहे. मला समजते की पिढ्या बदलतात. हा अनुभव घेणारा मी काही पहिलाच खेळाडू नाही आणि निश्चितच शेवटचाही नाही. मी जिथे आहे, तिथे मी आनंदी आहे."
"मी भारतासाठी यापूर्वीच खेळलो आहे, त्यामुळे आता ते साध्य करण्याची मला गरज नाही. जर आणखी एखादी संधी मिळाली तर उत्तमच, पण सध्या मी केवळ खेळावरील प्रेमापोटी खेळत आहे आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये नियमितपणे सहभागी होऊन शिस्तबद्ध राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी मी पुरेसे क्रिकेट खेळतो आणि ताजेतवाने राहण्यासाठी पुरेशी विश्रांती देतो," असेही भुवनेश्वरने पुढे म्हटले आहे.
भुवनेश्वरने RCB च्या दुसऱ्या विजेतेपदात मोठी भुमिका बजावली. त्याची पर्पल कॅप अवघ्या थोडक्यात हुकली. तो 2026 च्या आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज होता. त्याने 16 सामन्यांत 28 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर त्याने काही सामन्यांमध्ये फलंदाजीतही कमाल केली, यामुळे त्याला भारतीय संघात संधी दिली जावी अशा चर्चा सुरू झाल्या.
सद्यस्थिती पाहता भारताचे अनेक गोलंदाज विशेषत: वेगवान गोलंदाज मोठ्या प्रमाणात दुखापतग्रस्त होते आहेत. त्यामुळे पुढील वर्षी दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे खेळल्या जाणाऱ्या वनडे विश्वचषकात भुवनेश्वरला संधी दिली जाते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

