नवे लेख
ब्रिस्बेन कसोटीसाठी असा आहे ११ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ, पुकोस्कीच्या जागेवर 'या' खेळाडूला संधी

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून(15 जानेवारी) ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर कसोटी मालिकेतील चौथा आणि अखेरचा सामना रंगणार आहे. मात्र त्याआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा युवा सलामीवीर विल पुकोस्की चौथ्या कसोटीतून बाहेर पडला आहे.
पुकोस्कीला सिडनी येथे भारताविरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळताना क्षेत्ररक्षणावेळी चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने गुरुवारी(14 जानेवारी) स्पष्ट केले की पुकोस्की चौथा सामना खेळणार नाही. त्याच्या ऐवजी मार्कस हॅरीसला संधी दिली जाईल. बाकी कोणताही बदल ब्रिस्बेन कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या 11 जणांच्या संघात केला जाणार नाही.
विशेष म्हणजे पुकोस्कीने सिडनी कसोटीतून पदार्पण केले होते. मात्र पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच त्याला दुखापतग्रस्त व्हावे लागले. असे असले तरी त्याने या सामन्यात दुखापत होण्याआधी फलंदाजी करताना शानदार कामगिरी केली होती. त्याने पहिल्या डावात 62 आणि दुसऱ्या डावात 10 धावा केल्या होत्या.
पुकोस्कीने बुधवारी सराव सत्रात भाग घेतला होता, मात्र त्याने केवळ थोडी फलंदाजी केली होती, त्याने क्षेत्ररक्षणाच्या सरावात भाग घेतला नाही.
त्याच्या ऐवजी संधी मिळालेला मार्कस हॅरिस आता ब्रिस्बेन कसोटीत वॉर्नरसह सलामीला फलंदाजीसाठी उतरेल. पुकोस्कीव्यतिरिक्त सिडनी कसोटीत खेळलेले अन्य 10 खेळाडू ब्रिस्बेन येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीतही कायम असतील.
ब्रिस्बेन येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 5.30 वाजता सुरुवात होईल.
असा आहे 11 जणांचा ऑस्ट्रेलिया संघ -
डेविड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लॅब्यूशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, टीम पेन (कर्णधार/यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेजलवूड.
दुखापतग्रस्त हनुमा विहारीच्या जागी टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी 'हे' तीन खेळाडू प्रमुख दावेदार
चौथ्या सामन्यात विल पुकोवस्कीच्या जागी 'या' खेळाडूला दिली जावू शकते संधी, प्रशिक्षकांनी दिले संकेत
आयसीसीच्या ट्विटर अकाऊंटवर रंगला भारत-पाकिस्तानचा सामना, पाहा कोणी मारली बाजी