Dailyhunt
बुमराह-मलिंगा जे करू शकले नाही ते शमीने केले, आयपीएलमध्ये 'अशी' कामगिरी करणारा ठरला एकमेव गोलंदाज

बुमराह-मलिंगा जे करू शकले नाही ते शमीने केले, आयपीएलमध्ये 'अशी' कामगिरी करणारा ठरला एकमेव गोलंदाज

यपीएल २०२६ मध्ये बुधवारी (१ एप्रिल) लखनऊच्या एकाना स्टेडियमवर झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात यजमान संघ ६ विकेट्सने पराभूत झाला. लखनऊचा पराभव झाला असला तरी त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याची अप्रतिम कामगिरी सुरूच ठेवली आहे.

दिल्लीविरुद्ध पहिल्याच चेंडूवर त्याने विकेट घेत आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे.

एका वर्षापेक्षा अधिक काळ राष्ट्रीय संघातून बाहेर असलेल्या शमीने दिल्लीला लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर धक्का दिला. त्याने आयपीएलचा सर्वोत्तम सलामीवीर केएल राहुल याला शून्यावर बाद केले आणि आयपीएलच्या इतिहासात पहिल्याच चेंडूवर ५ विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. या स्पर्धेच्या १८ वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी कोणीही केली नाही.

या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकला आणि लखनऊला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. मिचेल मार्शच्या ३५ धावा आणि अब्दुल समादच्या ३६ धावांच्या जोरावर लखनऊने १८.४ षटकात सर्व विकेट्स गमावत १४१ धावसंख्या उभारली. दिल्ली लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरली असता शमीची गोलंदाजी प्रभावी ठरली. त्याने ४ षटकात २८ धावा देत एक विकेट घेतली.

शमी अधिक काळ संघाबाहेर राहिल्याने तो निवृत्ती घेतो की काय अशा चर्चा सुरू झाल्या होत्या, मात्र त्याने सामन्याआधीच स्पष्ट केले की त्याच्या मनात निवृत्तीचा विचार दूरपर्यंत नाही. "ज्यादिवशी मला आळस आणि कंटाळा येईल तेव्हा मी खेळ सोडेन. सध्या मला खेळाचा आनंद मिळत आहे," असे शमी म्हणाला आहे.

शमीच्या प्रभावी कामगिरीमुळे लखनऊच्या काही अडचणी दूर झाल्या, मात्र त्यांची फलंदाजी चिंतेचा विषय बनली आहे. दिल्लीकडून लुंगी एनगिडी आणि टी नटराजन यांनी आधी लखनऊची फलंदाजी फळी उद्ध्वस्त केली. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीच्या समीर रिझवीने लखनऊची गोलंदाजीचा समाचार घेतला. त्याने नाबाद ७० धावा केल्या. सामन्याचा निकाल लखनऊच्या बाजूने लागला नसला तरी शमीची गोलंदाजी संघासाठी जमेची बाजू ठरत आहे.

आयपीएलमध्ये पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक विकेट्स-
५ - मोहम्मद शमी
३ - प्रवीण कुमार
३ - उमेश यादव
३ - ट्रेंट बोल्ट
३ - लसिथ मलिंगा
३ - भुवनेश्वर कुमार
३ - अशोक डिंडा
३ - पॅट कमिन्स

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports