Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
CWG 2026: अस्मिता-हर्षची सुवर्ण कामगिरी; ज्युडोमध्ये भारताने प्रथमच जिंकला गोल्ड मेडल

CWG 2026: अस्मिता-हर्षची सुवर्ण कामगिरी; ज्युडोमध्ये भारताने प्रथमच जिंकला गोल्ड मेडल

यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (Commonwealth Games) नवव्या दिवशी, भारतीय ज्युडोपटूंनी ऐतिहासिक कामगिरी करत देशाची मान उंचावली. अस्मिता डेने महिलांच्या 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. त्यानंतर, हर्ष सिंगनेही पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय पुरुष ज्युडोपटू ठरला.

अस्मिता डे हिने अंतिम फेरीत कॅनडाच्या हेडी क्वाशचा पराभव करून भारतासाठी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटल्यानंतर तो गोल्डन स्कोर फेरीत गेला, जिथे अस्मिताने निर्णायक गुण मिळवून सुवर्णपदक आपल्या नावे केले.

त्रिपुरापासून सुरू झालेला सुवर्णमय प्रवास

अस्मिता डे ही त्रिपुरातील बेलोनिया शहराची रहिवासी आहे. ज्युडो खेळण्यापूर्वी ती 800 मीटर धावपटू होती. जिल्हास्तरीय निवड चाचणीदरम्यान तिची आवड ज्युदोकडे वळली आणि तिने या खेळात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

तिने भोपाळमधील साई प्रादेशिक केंद्रात प्रशिक्षक यशपाल सोलंकी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले. सध्या ती भारत सरकारच्या 'टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम' (TOPS) च्या विकास गटाचा भाग आहे.

हर्ष सिंगचीही ऐतिहासिक सुवर्णपदक कामगिरी

अस्मितापाठोपाठ, दिल्लीच्या हर्ष सिंगने पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून भारताचा आनंद द्विगुणित केला. अंतिम फेरीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ काट्झचा 10-0 अशा मोठ्या फरकाने पराभव केला आणि वाझा-अरी डावाच्या जोरावर विजय मिळवला.

त्याआधी, उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या पेड्रो कार्लोस अँटुन नेटोचा पराभव करून हर्ष अंतिम फेरीत पोहोचला होता. अंतिम फेरीतही त्याने आपले वर्चस्व कायम राखत सुवर्णपदक जिंकले.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी भारतीय ज्युडोपटू अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. यापूर्वी भारताने ज्युडो मध्ये पाच रौप्य आणि सहा कांस्यपदके जिंकली होती, परंतु सुवर्णपदक कधीच मिळवता आले नव्हते.

अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी ही दीर्घ प्रतीक्षा संपवली. त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीने भारताच्या कॉमनवेल्थ गेम्समधील ज्युडो प्रवासात एक नवीन अध्याय लिहिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports