Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
CWG 2026: एक-दोन नव्हे, तब्बल 10 बॉक्सर्स फायनलमध्ये! भारताला सुवर्ण इतिहास रचण्याची सुवर्णसंधी

CWG 2026: एक-दोन नव्हे, तब्बल 10 बॉक्सर्स फायनलमध्ये! भारताला सुवर्ण इतिहास रचण्याची सुवर्णसंधी

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये (Commonwealth Games/ CWG) भारताच्या बॉक्सर्सनी दमदार कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीत प्रवेश केला आणि देशाच्या सुवर्णपदकांच्या आशा अधिक उंचावल्या.

शुक्रवारी (31 जुलै) झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतींमध्ये भारताचे 10 बॉक्सर्स विजय मिळवत अंतिम फेरीत पोहोचले आहेत. त्यामुळे त्या सर्वांनी रौप्यपदक निश्चित केले असून सुवर्णपदकामध्ये त्याचे रुपांतर करण्याचा आता प्रयत्न करतील. हे सामने शनिवारी (1 ऑगस्ट) होणार, त्यामुळे हा दिवस भारतासाठी सुवर्णमय ठरणार आहे.

भारताने या स्पर्धेसाठी सात पुरुष आणि सात महिलांचा समावेश असलेले 14 सदस्यीय बॉक्सिंग पथक पाठवले. त्यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेती लव्हलिना बोरगोहेन (75 किलो) हिचाही समावेश आहे. तिला या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाल्याने ती थेट उपांत्य फेरीत लढली आणि ती जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केल्याने तिने आपले पहिले पदक निश्चित केले आहे.

महिला बॉक्सर्सची कामगिरी
बोरगोहेनसोबत या स्पर्धेत जास्मिन लांबोरिया (57 किलो), अरुंधती चौधरी (70 किलो), प्रीती पवार (54 किलो), प्रिया घंघास (60 किलो) आणि साक्षी चौधरी (51 किलो) यांनीही अंतिम फेरीत प्रवेश करत भारताच्या सुवर्णपदकांच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

उपांत्य फेरीत जास्मिनने लेसोथोच्या रापेलांग मासेलेला हिच्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले. तिला दुसऱ्या फेरीपर्यंत तब्बल तीन वेळा स्टॅंडिग काऊंट मिळाला. अखेर रेफरीने सामना थांबवत RSC (Referee Stops Contest) च्या आधारे जास्मिनला विजेता घोषित केले.

बाकी भारतीय बॉक्सर्सनी उपांत्य फेरीत पुढीलप्रकारे कामगिरी केली. अरुंधतीने गतविजेती वेल्सचा रोझी एक्लेस हिचा 4-0 असा पराभव केला. प्रीतीने झांबियाच्या कॅथरिन मवापे हिचा 5-0 आणि साक्षीने कॅनडाच्या ऍम्बर जेन वॉल हिचा 5-0 असा पराभव केला.

पुरुष बॉक्सर्सची कामगिरी
भारतीय पुरुष बॉक्सर्समध्ये जादुमणी सिंग मांडेगबाम (55 किलो), सचिन सिवाच (60 किलो), अंकुश पांघल (80 किलो) आणि नरेंद्र बेरवाल (+90 किलो) हे सर्व सुवर्णपदकाच्या लढतीत पोहोचले आहेत.

उपांत्य फेरीत जादुमणीने नामिबियाच्या PPM हाओसेब याचा 5-0, सचिनने वेल्सच्या ओवेन हॅपिस-ऍलनचा पराभव, अंकुशने घानाच्या जोशुआ ओफोरी याचा 5-0 आणि नरेंद्रने त्रिनिदाद-टोबॅगोच्या नायजेल पॉल याचा 5-0 असा पराभव केला.

भारतीय बॉक्सरच्या पहिल्या पदकाचा सामना शनिवारी (1 ऑगस्ट) दुपारी 3.30 मिनिटांनी सुरू होणार आहे. यामध्ये प्रीती पवार कॅनडाच्या स्कारलेट सवाना डेलगाडो हिच्याशी लढणार आहे.

भारताची पदक कामगिरी
भारताने CWG2026 मध्ये आतापर्यंत एकूण 23 पदके जिंकली आहे, ज्यामध्ये 5 सुवर्ण, 12 रौप्य आणि 6 कांस्यपदकांचा समावेश आहे. यामुळे भारत पदकतालिकेत दहाव्या स्थानी आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports