Friday, 10 Jul, 7.47 am महा स्पोर्ट्स

नवे लेख
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ६- २०१९ विश्वचषक उपांत्य सामन्यात पराभूत झाल्यानंतर ड्रेसिंग रूम मध्ये काय झाले?

-महेश वाघमारे

१० जुलै २०१९ हा दिवस भारतीय क्रिकेटप्रेमी कधीही विसरू शकत नाहीत. २०१९ च्या विश्वचषकात न्यूझीलंडच्या हातून निसटता पराभव झालेला दिवस. एकच सामना दोन दिवस चालला आणि भारतीय क्रिकेट संघ आणि चाहत्‍यांना न भरणारी जखम घेऊन गेला.

असंख्य क्रिकेटशौकीनांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, रोहित शर्माचा रडवेला चेहरा, मैदानातून बाद झाल्यावर पॅव्हेलियनमध्ये परतताना एमएस धोनीची देहबोली हे सर्व खऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी दुःखद‌ होते. साखळी सामन्यांतील ९ पैकी ७ सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत दाखल झालेला भारतीय संघ वर्ल्डकप मधून बाहेर पडला होता. पण, त्या पराभवानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये काय वातावरण होते ?

सामन्याची तारीख होती ९ जुलै. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत आणि न्यूझीलंड पहिल्या उपांत्य सामन्यात भिडणार होते. ब्रिटनमध्ये मोठ्या संख्येने असलेले भारतीय झाडून मैदानावर आलेले. जबरदस्त माहौल बनलेला. क्रिकेटच्या मैदानात १२ वा खेळाडू म्हणून प्रेक्षक भूमिका पार पाडतात आणि आज हा १२ खेळाडू भारताचा होता.

पावसाचा अंदाज होताच. परंतु, आयसीसीच्या नियमानुसार राखीव दिवस सुद्धा ठेवला गेलेला. विराट कोहली आणि केन विल्यमसन टॉससाठी मैदानावर उतरले. विल्यमसनने टॉस जिंकत अपेक्षेप्रमाणे फलंदाजी निवडली.

जसप्रीत बुमराहने मार्टिन गुप्टिल ला झटपट माघारी पाठवत दमदार सुरुवात केली. दुसरा सलामीवीर निकोल्स आणि कॅप्टन विल्यमसनने डाव सावरला. धोकादायक वाटत असलेली जोडी जडेजाने निकोल्सला बात करत फोडली. निकोल्स बाद झाला पण भारताला कायम त्रास देणारा रॉस टेलर मैदानात उतरला. कसलीच जोखीम न पत्करता दोघांनी धावफलक हलता ठेवला. विल्यमसनने आपले अर्धशतक पूर्ण केल्यावर जरा धावांचा वेग वाढवला पण तो गिअर बदलणार इतक्यात चहलने त्याला तंबूत धाडले. त्याच्यापाठोपाठ निशाम दुहेरी आकडा गाठताच माघारी परतला. ढग दाटून आलेले पाहताच टेलरने हात चालवायला सुरू केले. चहलला षटकार चौकार मारत अर्धशतक पूर्ण केले. ग्रँडहोम देखील थोडा आक्रमक व्हायला लागला परंतु इतक्यात पाऊस आला. पंचांनी २ षटके खेळ सुरू ठेवला आणि त्या मध्येच भुवनेश्वरने ग्रँडहोमला‌ बाद केले. पंचांनी पाऊस वाढल्याने खेळ बंद केला. २-३ वेळा ग्राउंडची पाहणी झाल्यानंतर खेळ दुसऱ्या दिवशी करण्याचे ठरले. तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या ४६.१ षटकात २११-५ होती.

दुसऱ्या दिवशी‌ खेळ सुरू झाल्यावर न्यूझीलंडने उरलेल्या २३ चेंडूत ३ बळी गमावत आणखी २८ धावांची भर घातली. भारताला फलंदाजीसाठी अवघड असलेल्या खेळपट्टीवर २४० धावांचे आव्हान मिळाले.

तुफान फॉर्ममध्ये असलेला उपकर्णधार रोहित शर्मा आणि त्याला तोलामोलाची साथ देणारा के एल राहुल मैदानावर उतरले. ट्रेंट बोल्टने एक धाव देत आपल्या संघासाठी चांगली सुरुवात केली. दुसऱ्या षटकात मॅट हेन्रीने रोहितला बाद केले. मैदानामध्ये शांतता पसरली. तिसऱ्या षटकात बोल्टने कोहलीला पायचीत पकडले. चौथ्या षटकात पुन्हा हेन्रीने राहुलला यष्टिरक्षक लॅथमकडे झेल देण्यास भाग पाडले. भारताच्या पहिल्या तीनही खेळाडूंच्या नावासमोर १,१,१ धावा दिसत होत्या वर्ल्डकप दूर जात होता. १० व्या षटकांत दिनेश कार्तिक बाद झाला. संघाची धावसंख्या २४-४ आणि मैदानात अजूनही सर्वात अनुभवी एमएस धोनी आला नव्हता.

काय चाललंय कोणाला काही समजत नव्हते. युवा रिषभ पंत व हार्दिक पांड्या यांनी डाव सावरला. २२.५ षटकात ७१ धावा झाल्या असता पंत बाद झाला. इतक्या महत्त्वाच्या सामन्यात भारताचा सर्वोत्तं फिनिशर सातव्या क्रमांकावर येत होता सगळंच अनाकलनीय होत. धोनी पांड्या जोडी जमणार असे वाटत असताना सॅटनरने पांड्याला फसवले. भारताचा डाव गडगडला होता. जिंकण्यासाठी २० षटकात १४८ धावांची गरज होती आणि गडी शिल्लक होते चार.

धोनीने एक बाजू लावून धरली आणि रवींद्र जडेजाला फटके मारण्याची मुभा दिली. जडेजाने कसलीही दयामाया न दाखवता न्यूझीलंडच्या गोलंदाजांना हल्ले करायला सुरुवात केली. चौकार-षटकारांची आतिशबाजी करत त्याने अर्धशतक पूर्ण केले. १४ चेंडूत ३२ धावांची आवश्यकता असताना जडेजाने विल्यमसनच्या हाती झेल दिला. मैदानावर स्मशानशांतता पसरली. ५९ चेंडूत ४ चौकार व ४ षटकारांच्या सहाय्याने त्याने ७७ धावांची लाजवाब खेळी केली होती.

भारताच्या सगळ्या आशाआकांक्षा एका नावाभोवती केंद्रित झाल्या होत्या. नाव होते एम एस धोनी.

गेली १५ वर्ष असे कित्येक सामने त्याने जिंकून दिले होते. आज " One Last Time" अशी प्रेक्षक अपेक्षा करत होता. ४९ वे षटक टाकण्यासाठी लॉकी फर्ग्युसन आला. १२ चेंडूत ३० धावांची आवश्यकता. हेच ते षटक होते, ज्यात जास्तीत जास्त धावा काढून ,अंतिम षटकासाठी एक सुरक्षित धावसंख्या शिल्लक ठेवण्याचे.

फर्ग्युसनने पहिला चेंडू टाकला. आखूड टप्प्याचा हा चेंडू पॉईंटवरून सरळ सीमारेषा पार षटकार. धोनीने षटकाची सुरुवात मनासारखी केली. ज्या धोनीवर इतकी वर्ष विश्वास ठेवला तो धोनी आपल्याला नाराज करणार नाही असे सर्वांना वाटले. पुढचा चेंडू निर्धाव गेला. तिसरा चेंडू फर्ग्युसनने पुन्हा आखूड टाकला. तो धोनीच्या हाताला लागून वर उडाला धोनी आणि भुवनेश्वरने एक धाव पूर्ण केली. धोनी दुसऱ्या धावेसाठी पळाला पण...

२००३ विश्वचषक अंतिम फेरीतील पराभवानंतरची भारतीय क्रिकेटमधील सर्वात वाईट घटना घडली. मार्टिन गुप्टिलचा थ्रो सरळ स्टंपवर लागला. धोनी धावबाद झाला होता. भारताचे विश्वचषक विजयाचे स्वप्न पुन्हा भंगले होते.

संपूर्ण भारत निराश झाला होता. न्युझीलँडने भारताला १८ धावांनी हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

सर्व खेळाडू दुःखी होते. ड्रेसिंग रूममध्ये पूर्ण शांतता होती. कोणी काही बोलत नव्हते. काही खेळाडूंच्या डोळ्यात पाणी दिसत होते, पण ते बाहेर येत नव्हते. प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सर्व खेळाडूंना एकत्र बोलवलं आणि म्हणाले, " मी जाणतोय तुम्ही निराश आहात. पण, आपण गेली दोन वर्ष जी मेहनत घेतली ती वाया गेली नाही. दोन वर्षाची मेहनतीची किंमत अशा ३० मिनिटात करता येत नाही. आपण चांगलेच खेळलोय. सर्व देशाला तुमच्यावर अभिमान आहे. आपण ताठ मानेने उभे रहायला हवे."

या घटनेनंतर, भारताचे फिजियो पॅट्रिक फरहात खूप दुःखी झाले. त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. याच दिवसानंतर क्रिकेटप्रेमींनी एमएस धोनीला मैदानावर पाहिले नाही.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top