Wednesday, 27 Jan, 6.12 pm महा स्पोर्ट्स

टॉप बातम्या
एक वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणार इशांत शर्मा; 'या' संघाविरुद्ध खेळला होता शेवटचा सामना

इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात इंग्लडंचा संघ ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंडच्या या दौऱ्याला ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथून कसोटी मालिकेने सुरुवात होईल. या कसोटी मालिकेतील पहिले २ सामने चेन्नई येथे होणार आहेत. या दोन सामन्यांसाठी काहीदिवसांपूर्वी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने पुनरागमन केले आहे.

त्यामुळे इशांत तब्बल १ वर्षांनी कसोटी सामना खेळताना दिसणार आहे. त्याला नुकताच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौरा दुखापतीमुळे मुकावा लागला होता.

आयपीएलदरम्यान झाली दुखापत -

मागीलवर्षी युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामादरम्यान इशांत शर्माला पाठीची दुखापत झाली होती. दिल्ली कॅपिटल्स संघात असणाऱ्या इशांतला सरावादरम्यान पाठीच्या स्नायूंमध्ये ताण आला होता. त्यामुळे त्याला आयपीएलचा हा हंगामही अर्धा सोडून भारतात परतावे लागले होते. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यातूनही बाहेर पडावे लागले होते.

एक वर्षांपूर्वी खेळला शेवटचा कसोटी सामना

इशांतला दुखापतीमुळे बराच काळ कसोटी क्रिकेटपासून दूर रहावे लागले आहे. त्याने शेवटचा कसोटी सामना १ वर्षांपूर्वी न्यूझीलंड दौऱ्यात खेळला होता. वेलिंग्टन येथे २१ ते २४ फेब्रुवारी २०२० ला झालेला कसोटी सामना त्याचा शेवटचा सामना आहे. त्या सामन्यात त्याने पहिल्या डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. मात्र त्यानंतर लॉकडाऊन आणि नंतर आयपीएलमध्ये दुखापत झाल्याने त्याला कसोटी खेळता आली नाही.

दुखापतीवर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत केले काम -

आयपीएलदरम्यान दुखापत झाल्यानंतर लगेचच इशांत भारतात परतला होता. त्यानंतर तो बंगळुरुमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दाखल झाला होता. तिथे त्याने त्याच्या दुखापतीवर आणि फिटनेसवर बराच दिवस मेहनत घेतली. त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी फिटनेस टेस्टही झाली होती. पण त्यावेळी पूर्ण फिटनेस यावा म्हणून त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर न पाठवण्याचा निर्णय झाला. यानंतर आता इशांत दुखापतीतून पूर्ण सावरला असून सध्या तो सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी खेळत आहे. त्याने दिल्लीकडून ४ सामन्यात ५ विकेट्सही घेतल्या.

इशांत शर्मा भारतीय संघातील सर्वात अनुभवी क्रिकेटपटू -

सध्या भारतीय कसोटी संघात खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये इशांत हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याचे २००७ मध्ये कसोटीत पदार्पण झाले असून त्याच्याकडे ९७ कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. या ९७ सामन्यात त्याने २९७ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याने ११ वेळा एका डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तसेच १ वेळा सामन्यात १० विकेट्स घेण्याची कारनामा केला आहे.

याशिवाय इशांतने ८० कसोटी सामने खेळताना ११५ विकेट्स आणि १४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना ८ विकेट्स घेतल्या आहेत.

इशांत १०० कसोटी सामन्यांच्या आणि ३०० कसोटी विकेट्सच्या उंबरठ्यावर

इशांतने आत्तापर्यंत ९७ कसोटी सामने खेळले आहेत. आता इंग्लंड विरुद्धच्या चेन्नई विरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी त्याचे भारताच्या कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे जर तो हे दोन्ही सामने खेळला आणि त्याला इंग्लंडविरुद्ध अहमदाबादला होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठीही भारतीय संघात संधी मिळाली तर तो कारकिर्दीत १०० कसोटी सामने खेळण्याचा पराक्रम करु शकतो. तसेच भारताकडून १०० कसोटी सामने खेळणारा ११ वा खेळाडू ठरु शकतो.

याशिवाय इशांतला त्याच्या कारकिर्दीत ३०० कसोटी विकेट्स पूर्ण करण्यासाठी केवळ ३ विकेट्सची आवश्यकता आहे. त्याने २९७ विकेट्स घेतल्या आहेत. तो कसोटीत ३०० विकेट्स घेणारा भारताचा केवळ सहावाच गोलंदाज ठरेल. तसेच कपिल देव आणि झहिर खाननंतरचा तिसराच वेगवान गोलंदाज ठरेल.

इंग्लंडविरुद्ध या खेळाडूची घेऊ शकतो जागा-

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर आता भारतीय संघ व्यवस्थापनासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे ती अंतिम ११ जणांच्या संघात संधी द्यायची कोणाला. कारण एकिकडे विराट कोहली, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा असे खेळाडू कसोटी संघात पुनरागमन करत आहेत, तर दुसरीकडे युवा क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्वांना प्रभावित केले आहे.

पण असे असले तरी इशांतच्या अनुभवाचा विचार केला जाऊ शकतो. त्यानुसार त्याला इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटींदरम्यान नवदीप सैनी ऐवजी अंतिम ११ जणांच्या संघात संधी दिली जाऊ शकते. सैनी दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा भाग नाही. तसेच टी नटराजनला देखील पालकत्व रजा देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर इशांत आणि जसप्रीत बुमराह अंतिम ११ जणांच्या संघात खेळू शकतात.

आयर्लंडविरुद्धच्या दमदार कामगिरीनंतर राशिदने केले मोठे वक्तव्य, म्हणाला.

विराट सापडला कायद्याच्या कचाट्यात, मिळाली कायदेशीर नोटीस

क्रिकेटमध्ये पुन्हा 'मॅच फिक्सिंग', 'या' खेळाडूंना केले गेले निलंबित

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top