क्रिकेटवर्तुळात मागील काही दिवसांपासून अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. संघ 2027 च्या वनडे विश्वचषकाची पूर्वतयारी करण्यात व्यस्त असताना आणखी एका संघाच्या नेतृत्वात बदल झाला आहे. नेदरलॅंड्स क्रिकेट संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स आपल्या पदावरून पायउतार झाला आहे.
यामुळे त्याचा चार वर्षांचा कर्णधार म्हणून कार्यकाळ संपुष्टात आला.
रॉयल डच क्रिकेट असोसिएशनने (KNCB) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत, या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यामध्ये एडवर्ड्सने आपल्या संघसहकाऱ्यांना उद्देशून म्हटले, "तुम्हाला अचानक ही बातमी दिल्याबद्दल दिलगीर आहे, पण मी कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेत आहे. मी मुख्य प्रशिक्षक रायन कुक आणि इतरांशी याबद्दल चर्चा केली आहे. माझ्या मते, हा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे. खेळाडू म्हणून मी संघाला अजून बरेच काही देऊ शकेन. नेदरलॅंड्सचे नेतृत्व करणे ही सन्मानजनक बाब होती आणि मी पुढेही ऑरेंज जर्सी घालण्यास उत्सुक आहे."
जून 2022 पासून नेतृत्वा सांभाळणाऱ्या एडवर्ड्सचा कार्यकाळ शुक्रवारी (31 जुलै) क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 च्या टप्प्याच्या समाप्तीबरोबर संपला. त्याच्या जागी अष्टपैलू बास डी लीड याची नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तो लीग 2 च्या उर्वरित सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करेल.
जय शाह आणि आयसीसीच्या निर्णयावर एडवर्ड्सचे वक्तव्य
नुकतेच एडवर्ड्सने 2027 च्या पुरुष एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता आणि स्वरुपांमध्ये आयसीसीने केलेल्या बदलांवर तीव्र नाराजी व्यक्त केला होती.
एडवर्ड्सने वर्ल्ड क्रिकेटर्स असोसिएशशी बोलताना म्हटले, "आयसीसी जागतिक स्तरावर क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचा दावा करत असली तरी, तिने असे नियम लागू केले आहेत, ज्यामुळे नेदरलँड्ससारख्या सहयोगी राष्ट्रांना मोठ्या स्तरावर खेळण्याच्या संधी आणखी मर्यादित झाल्या आहेत. अनेक वर्षांच्या नियोजनानंतर आणि गुंतवणुकीनंतर, असे बदल लहान राष्ट्रांच्या विकासासाठी अत्यंत निराशाजनक आहेत."
आयसीसीने विश्वचषक स्पर्धेसाठी केलेल्या बदलांमुळे सहयोगी राष्ट्रांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ते कसे पुढीलप्रमाणे,
पुढील वर्षी दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणारा विश्वचषक तांत्रिकदृष्ट्या 14 संघांमध्येच खेळला जाईल, जी 2019 आणि 2023 च्या आवृत्त्यांपेक्षा वाढलेली संख्या आहे. परंतु, स्पर्धेची सुरुवात करण्यासाठी सर्वात कमी मानांकन असलेल्या पात्रताधारक संघांमध्ये तीन-संघांची, साखळी पद्धतीने 'सुपर सिरीज' सुरू करण्यात आल्यामुळे, त्यापैकी दोन संघ प्रत्येकी फक्त दोन सामने खेळून स्पर्धेतून बाहेर पडतील.
तसेच नव्या फॉरमॅटमुळे सहयोगी राष्ट्रांना मुख्य फेरीत पोहोचण्याच्या कमी संधी आहेत, असे त्या संघांच्या खेळाडूंनी म्हटले आहे. नव्या फॉरमॅटनुसार अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या संघांना मुख्य गटात प्रवेश करण्याऐवजी अंतर्गत प्लेऑफला सामोरे जावे लागल्यास लांबलचक बहु-वर्षीय पात्रता लीग (जसे की विश्वचषक लीग 2) खेळावी लागणार.
नेदरलँड्स सध्या क्रिकेट विश्वचषक लीग 2 च्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेच्या शेवटी अव्वल चार संघांना विश्वचषक पात्रता फेरीत थेट प्रवेश मिळेल. नेदरलँड्सची पुढील मालिका या वर्षाच्या अखेरीस ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्याविरुद्ध आहे. (Scott Edwards steps down as Captain of the Netherlands cricket and Bas de Leede is a new skipper)

