Sunday, 24 Jan, 10.44 am महा स्पोर्ट्स

नवे लेख
इंग्लंडने आता ऍशेसच्याही पुढे जाऊन भारताला भारतात पराभूत करण्यावर लक्ष द्यावं, 'या' दिग्गजाने दिला सल्ला

भारतीय क्रिकेट संघ नुकताच ऑस्ट्रेलियन संघाला कसोटी मालिकेत २-१ अशा फरकाने पराभूत करुन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन मायदेशी परतला आहे. या कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला ब्रिस्बेन येथे झालेल्या सामन्यातही पराभूत केले. त्यामुळे तब्बल ३२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावर ब्रिस्बेन येथे पराभूत होण्याची नामुष्की ओढावली. त्यानंतर आता इंग्लंडचा संघ भारतीय संघाशी दोन हात करण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. त्याआधी इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅमी स्वानने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

स्वानने म्हटले आहे की इंग्लंडने आता केवळ ऍशेस विजयावर नाही तर भारताला त्यांच्याच देशात हरवण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.

'द सन'शी बोलताना स्वान म्हणाला, 'इंग्लंड नेहमी ऍशेससाठी तयारी करत असतात. पण आता ऑस्ट्रेलिया जगातील सर्वोत्तम संघ राहिलेला नाही. तो पूर्वी सर्वोत्तम संघ होता. पण आता ते नाहीत. मात्र, आपण तरीही अजून ऍशेसला महत्त्वाचं समजत आहोत.'

तो पुढे म्हणाला, 'आपण ऍशेसच्याही पुढे आता पाहायला हवे. सध्या भारताला भारतात पराभूत करणे कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठे आहे. आपण त्यांना २०१२ ला पराभूत केल्यानंतर ते अक्षरश: खरंच अपराजित असल्यासारखे आहेत. ही मोठी गोष्ट नाही का?'

त्याचबरोबर स्वान म्हणाला, जर इंग्लंडला सर्वोत्तम संघ बनायचे असेल तर त्यांनी केवळ ऑस्ट्रेलियालाच पराभूत करण्याचा विचार करु नये. तसेच त्याने सल्ला दिला की इंग्लंडच्या खेळाडूंनी मागील चूकांमधून शिकून केविन पीटरसनप्रमाणे खेळले पाहिजे, जसे तो २०१२ मध्ये भारताविरुद्ध खेळला होता.

स्वान म्हणाला, 'आमचा संघ फिरकी खेळणार्‍या सर्वोत्तम फलंदाजांसोबत का जात नाही हे मला समजत नाही. फिरकी गोलंदाजी खेळू शकलो तर आपण भारताला पराभूत करु शकतो. जोपर्यंत फिरकी गोलंदाज विकेट्स घेणार नाहीत, तोपर्यंत आपण भारताला पराभूत करु शकणार नाही आणि आपल्याला केविन पीटरसन प्रमाणे कोणीतरी हवे.'

स्वान पीटरसनबद्दल म्हणाला, 'तो आक्रमक होता. केपी अफलातून खेळाडू होता आणि त्याने तिथे (भारतात) अविश्वसनीय फलंदाजी केली होती. त्यानंतर आपण तशी कामगिरी केली नाही. आपण केविनच्या फलंदाजीतून शिकलो नाही.'

इंग्लंडचा संघ भारताविरुद्ध ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे. कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिले २ सामने चेन्नईत खेळले जाणार आहेत. त्यानंतर शेवटचे २ कसोटी सामने अहमदाबाद येथीने नव्याने बांधण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमवर होणार आहेत. यानंतर अहमदाबाद येथेच ५ टी२० सामने होतील. त्यानंतर पुण्यात ३ वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाईल.

ऑस्ट्रलिया दौऱ्याआधी पंतने व्यक्त केली होती 'ही' इच्छा, सुरेश रैनाने केला खुलासा

द्रविडचा 'तो' इमेल शेअर करत पीटरसनची भारत दौऱ्याआधी इंग्लंडच्या सलामीवीरांना मदत

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top