Saturday, 24 Aug, 1.48 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
काय सांगता! एकाच टी२० सामन्यात शतक आणि ८ विकेट्स, भारताच्या कृष्णप्पा गॉथमचा पराक्रम

कर्नाटक प्रीमीयर लीगमध्ये काल (23 ऑगस्ट) बेल्लारी टस्कर्स विरुद्ध शिवमोग्गा लायन्स संघात सामना पार पडला. या सामन्यात बेल्लारी टस्कर्स संघाकडून कृष्णप्पा गॉथमने फलंदाजी करताना शतकी खेळी केली आणि गोलंदाजीत 8 विकेट्स घेतल्या. त्याच्या या अविश्वसनीय अष्टपैलू खेळामुळे बेल्लारी टस्कर्स संघाने 70 धावांनी विजय मिळवला.

पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी 17 षटकांचा करण्यात आलेल्या या सामन्यात बेल्लारी टस्कर्स संघाने प्रथम फलंदाजी केली. त्यांच्याकडून गॉथमने 56 चेंडूत नाबाद 134 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 13 षटकार मारले. तसेच त्याने त्याचे हे शतक 39 चेंडूत पूर्ण केले होते.

त्याच्या या तुफानी शतकामुळे बेल्लारी टस्कर्स संघाने 17 षटकात 3 बाद 203 धावा केल्या.

त्यानंतर 17 षटकात 204 धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला उतरलेल्या शिवमोग्गा लायन्स संघाला 16.3 षटकात सर्वबाद 133 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून पवन देशपांडे(46) आणि अक्षय बल्लाळने(40) चांगली लढत दिली.

मात्र बेल्लारी टस्कर्स संघाकडून गॉथमने 4 षटकात केवळ 15 धावा देऊन 8 विकेट्स घेत शिवमोग्गा लायन्स संघाच्या डावाला खिंडार पाडले आणि बेल्लारी टस्कर्स संघाचा विजय निश्चित केला.

शानदार कामगिरीनंतरही गॉथमची टी20 विक्रमाच्या यादीत नोंद नाही-

गॉथमच्या या शानदार कामगिरी नंतरही त्याची कोणत्याही टी20 विक्रमाच्या यादीत नोंद होणार नाही. कारण राज्य क्रिकेट लीगच्या सामन्यांना टी20 सामन्यांचा दर्जा नसल्याने हे सामने अनधिकृत होते.

याआधी ऑगस्टच्या सुरुवातीला टी20 ब्लास्ट लीग स्पर्धेत लेसेस्टरशायरचा कर्णधार कॉलिन एकर्मनने वारविक्शायर विरुद्ध 18 धावात 7 विकेट्स घेत टी20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करण्याचा इतिहास रचला होता.

या विक्रमाला गॉथमने काल मागे टाकले असले तरीही कर्नाटक प्रीमीयर लीगला टी20 क्रिकेटचा दर्जा नसल्याने हा विक्रम एकर्मनच्याच नावावर कायम राहणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top