इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ मध्ये सलामीवीर-विकेटकीपर संजू सॅमसनची सुरूवात निराशाजनक झाली आहे. तो सलग दोन सामन्यांत एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे. त्यामुळ त्याच्या फलंदाजीबाबत चर्चा सुरू झाली आहे, अशातच चेन्नई सुपर किंग्जचे (सीएसके) मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी त्याला आपला पाठिंबा दर्शविला आहे.
आयपीएल १९च्या हंगामाआधी संजूला राजस्थान रॉयल्सकडून ट्रेड केले गेले, तसेच त्याने टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत भारताच्या विजयात महत्वाची भुमिका पार पाडली होती. त्याला त्या स्पर्धेच्या शेवटच्या काही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. त्यामध्ये केवळ ५ सामन्यात ३२१ धावा केल्या होत्या. यामुळे तो आयपीएलमध्येही धमाकेदार सुरूवात करेल अशा अपेक्षा निर्माण झाल्या होत्या, मात्र तसे झाले नाही. तो राजस्थानविरुद्ध ६ आणि पंजाब किंग्जविरुद्ध ७ धावा करत बाद झाला.
संजूची ही संथ सुरूवात चिंतेचा विषय नाही, असे म्हणत फ्लेमिंगने त्यांचे मत व्यक्त केले आहे. ते सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "तो प्रत्येक वेळा धावा करणार नाही. हे टी२० क्रिकेट आहे आणि त्याने केवळ एकच शॉट खेळला जो बॅटची कड घेऊन मारला, मात्र तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याचा चांगला सराव सुरू असून तो जेव्हा लयीत येतो तेव्हा तो अनेकदा सामने जिंकून देतो. त्यामुळे दोन डावांमधील कामगिरीमुळे चिंतेचे कारण निर्माण होत नाही."
चेपॉक स्टेडियमवर संजूची आकडेवारी धक्कादायक आहे. येथे त्याने ६ आयपीएल सामने खेळताना ११ च्या सरासरीने आणि १०० च्या स्ट्राईक रेटने ६६ धावा केल्या आहेत. बाकी मैदानांवरील किमान पाच सामने खेळलेल्यांपैकी ही त्याची सर्वात कमी सरासरी आहे. चेपॉकवर आणखी सहा सामन्यांचे नियोजन असल्याने त्याच्या आकडेवारीत चांगले बदल होतील, अशी आशा सीएसकेला आहे.
फ्लेमिंग यांनी टी२० मध्ये फिनिशरच्या भुमिकेबद्दलही वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, "मला नाही वाटत फिनिय़र नावाची बाब अस्तित्वात आहे, कारण प्रत्येकजण पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी करत आहे. त्यामुळे डावाच्या सुरूवातीपासूनच १०,११ धावगतीची अपेक्षा असते. ४० धावांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक आक्रमक पवित्रा घ्यावा लागतो आणि आमच्याकडे तसा संघ आहे."
सीएसकेने मागील हंगामातही निराशाजनक कामगिरी केली होती. त्यांनी १४ पैकी केवळ ४ सामने जिंकले होते आणि त्या हंगामात स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला होता. आता नव्या हंगामाचीही सुरूवात पराभवाने झाली असल्याने संघ पुढील सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे असणार आहे.

