आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 जपानमध्ये खेळली जाणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्याआधीच चर्चेत आली आहे. क्रिकेट संघांच्या राहण्याच्या सुविधांवरून एक वादग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. भारत आणि पाकिस्तानसारख्या प्रमुख क्रिकेट मंडळांनी तक्रार केली आहे की, त्यांच्या खेळाडूंना देण्यात आलेल्या हॉटेलच्या खोल्या खूपच लहान आहेत.
यावर जपान क्रिकेट असोसिएशनने आता स्पष्टीकरण दिले आहे.
क्रिकेट मंडळांनी केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले होते की, दोन खेळाडूंना एका खोलीत सामावून घेणे आणि त्यांचे किट बॅग वाहून नेणे अवघड होईल. तसेच हॉटेल स्टेडियमपासून 20 किलोमीटर आणि स्वच्छतागृहे 500 मीटर अंतरावर असल्याने मंडळांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
स्पर्धा सुरू होण्याआधी सर्व सुविधांची एकदा पाहणी करण्याची इच्छा बोर्डांनी वर्तवली होती. यानंतर आता जपान क्रिकेट असोसिएशनचे (JCA) सीईओ नाओकी ऍलेक्स मियाजी यांनी परिस्थिती स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, जर संघांना त्यांना दिलेल्या सुविधा आणि हॉटेल्स आवडल्या नसतील, तर त्यांची स्वत:च्या खर्चाने आपली सुविधा करावी.
मियाजी यांनी पीटीआयला सांगितले, "एसीसी (ACC) बऱ्याच काळापासून ऐनागॉक (आयची-नागोया आशियाई क्रीडा आयोजन समिती) सोबत निवास व्यवस्थेच्या पर्यायांवर चर्चा करत आहे."
"क्रिकेटमधील सहभागी संघांना हॉटेलमध्ये राहण्याची सोय दिली जात आहे. इतर अनेक खेळांसाठी क्रूझ शिप किंवा कंटेनर हॉटेल्ससारख्या अत्यंत मर्यादित सुविधांची सोय केली जात आहे. तसेच संघांना त्यांच्या इच्छेनुसार स्वतःच्या निवास व्यवस्थेची सोय करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे."
स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक
या स्पर्धेतील क्रिकेटचे सामने जपानमधील निशिन शहरातील कोरोगी स्पोर्ट्स पार्कमध्ये खेळले जातील. आशियाई खेळ 17 सप्टेंबरपासून सुरू होत आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाचा पहिला सामना 18 सप्टेंबर रोजी जपानविरुद्ध आहे.
या स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. भारताची मोहिम थेट उपांत्यपूर्व फेरीपासून सुरू होणार आहे. त्यांचा पहिला सामना 28 सप्टेंबर रोजी आहे. (Asian Games 2026 "If you aren't satisfied, make your own hotel arrangements" saya Japan Cricket Association)

