Wednesday, 27 Jan, 11.36 pm महा स्पोर्ट्स

टॉप बातम्या
मुंबई टू टीम इंडिया व्हाया केरळ! भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरचा संघर्षमय प्रवास

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान ५ फेब्रुवारीपासून चार कसोटी सामन्यांची 'हाय वोल्टेज' मालिका सुरू होत आहे. दोन्ही संघ विजय रथावर स्वार असल्याने ही मालिका कमालीचे अटीतटीची होऊ शकते. दोन्ही संघांनी या मालिकेसाठी दर्जेदार खेळाडूंची फौज उभी केलेली दिसते. यजमान भारतीय संघाने या मालिकेसाठी मुख्य संघासह पाच राखीव खेळाडू व ५ नेट बॉलर्सचा समावेश केलेला आहे. या पाच गोलंदाजांमध्ये केरळच्या मात्र सध्या तमिळनाडूसाठी खेळणाऱ्या एका वेगवान गोलंदाजाची निवड केली गेली. हा गोलंदाज म्हणजे संदीप वॉरियर.

सर्वसामान्य घरातील मुलगा

संदीपचे वडील श्रीनिवास हे बँकेत कर्मचारी होते. सुरुवातीच्या काळात संदीप आपल्या कुटुंबासह मुंबईत राहत. भारतीय क्रिकेटचे माहेरघर असलेल्या मुंबईत त्याला क्रिकेटची गोडी लागली. संदीपने शाळेत असल्यापासूनच कनिष्ठ स्तरावर क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मुंबईतील मैदाने गाजवल्यानंतर वयाच्या सोळाव्या वर्षी तो आपले राज्य असलेल्या केरळमध्ये दाखल झाला. केरळमध्ये आल्यानंतर संदीपने अधिक मेहनत घ्यायला सुरुवात केली. दोन वर्षातच जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केल्याने त्याला वरिष्ठ संघात खेळण्याची संधी मिळाली. वयाच्या विसाव्या वर्षी त्याला केरळच्या रणजी संघात स्थान देण्यात आले. २०१३ च्या रणजी हंगामात गोव्याविरुद्ध त्याने प्रथमश्रेणी पदार्पण केले.

केरळच्या गोलंदाजी आक्रमणाचा प्रमुख

संदीप प्रथम श्रेणी पदार्पण केल्यापासून केरळच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करत आहे. २०१८-२०१९ च्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेमध्ये संदीपने ६ सामन्यात बारा बळी मिळवले होते. याच वर्षी रणजी ट्रॉफीत त्याची कामगिरी दमदार राहिली. या हंगामात त्याच्या नावे ४४ बळी होते. केरळला रणजी ट्रॉफी इतिहासात प्रथमच उपांत्य फेरीपर्यंत नेण्यात संदीपचा सिंहाचा वाटा होता. संदीपच्या नावे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हॅट्रिक देखील आहे.

आयपीएल कारकीर्द

आयपीएल २०१३ आधी नेट बॉलर म्हणून तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या चमूत दाखल झाला. नेट बॉलर म्हणून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीला प्रभावित केल्यानंतर त्याची मुख्य संघात निवड झाली. मात्र, त्याला या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. संदीपला सामना खेळायला मिळाला नसला तरी, भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खान तसेच प्रवीण कुमार यांच्यासमवेत त्याला बहुमूल्य वेळ घालवण्याची संधी मिळाली. भारताच्या या दिग्गजांकडून स्विंग गोलंदाजीचे कौशल्य शिकला.

संदीपला आपले आयपीएल पदार्पण करण्यासाठी २०१९ सालाची वाट पहावी लागली. कोलकत्ता नाइट रायडर्स संघाने त्याला स्पर्धा सुरू होण्याच्या अवघ्या १० दिवस आधी आपल्या संघात सामील करून घेतले. कमलेश नागरकोटी स्पर्धेतून बाहेर झाल्याने त्याला ही संधी मिळाली होती. संदीपने या हंगामात दोन सामने खेळताना तीन बळी आपल्या नावे केले.

बंडखोर संदीप

आपल्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीत संदीप फक्त एकदाच वादात अडकला आहे. २०१८-२०१९ चा विजय हजारे ट्रॉफीवेळी त्याच्यावर तीन सामन्यांची बंदी लादण्यात आली होती. केरळचा तत्कालीन कर्णधार सचिन बेबी मनमानी कारभार करत असल्याचे कारण देत पाच खेळाडूंनी संघटनेला पत्र लिहिले होते. या पाच खेळाडूंमध्ये संदीपसोबत रोहन प्रेम, मोहम्मद अजहरुद्दिन, रायफी गोमेझ व केएम यांचा समावेश होता.

केरळ टू तामिळनाडू

संदीपने २०१९ मध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला. संदीपने आपले गृहराज्य सोडून तमिळनाडूसाठी खेळण्याची इच्छा व्यक्त केली. केरळ क्रिकेट संघटनेने त्याला ना हरकत प्रमाणपत्र दिले आणि तो तमिळनाडू संघात दाखल झाला. संदीपला त्यावेळी इंडिया सिमेंटने नोकरीत सामावून घेतले. सोबतच, चेन्नईतील प्रसिद्ध एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये तो नियमितपणे सराव करू लागला. सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेत तमिळनाडू संघाला उपांत्य फेरीपर्यंत नेण्यात संदीपने हातभार लावला आहे.

भारतीय संघ व्यवस्थापन सातत्याने गुणवान वेगवान गोलंदाजांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी देत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेट बॉलर म्हणून गेलेल्या टी. नटराजनला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे, संदीपचे नशीब उलगडले तर तो देखील लवकरच भारतीय संघाचा घटक बनून जाईल.

महत्वाच्या बातम्या:

कराची कसोटीत पाकिस्तानला आघाडी, फवाद आलमचे संघर्षपूर्ण शतक

वनक्कम टीम इंग्लंड! जो रूटचा संघ पोहोचला चेन्नईत

क्वारंटाईनमध्ये रहाणे घालवतोय मुलीसोबत वेळ, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top