Dailyhunt
पॅट कमिन्समुळे हैदराबाद संघाची धाकधूक वाढली; आयपीएल अर्ध्यावर सोडून मायदेशी रवाना!

पॅट कमिन्समुळे हैदराबाद संघाची धाकधूक वाढली; आयपीएल अर्ध्यावर सोडून मायदेशी रवाना!

नरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल 2026 च्या हंगामात आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत, ज्यापैकी त्यांनी एका सामन्यात विजय मिळवला आहे, तर एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या दोन्ही सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या नेतृत्वाची जबाबदारी ईशान किशनने सांभाळली होती. हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स याच्याबद्दल आधीच स्पष्ट करण्यात आले होते की, तो पाठीच्या दुखापतीतून (Back Injury) पूर्णपणे सावरू शकलेला नाही, ज्यामुळे तो सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे. दरम्यान, कमिन्स सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात सामील झाला होता, मात्र आता तो पुन्हा आपल्या मायदेशी परतत आहे, ज्यामुळे सनरायझर्स हैदराबादच्या चिंतेत नक्कीच भर पडली आहे.

​ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, पॅट कमिन्स आपल्या पाठीच्या दुखापतीचे स्कॅनिंग करण्यासाठी पुन्हा ऑस्ट्रेलियाला जात आहे, जिथे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या देखरेखीखाली त्याची तपासणी केली जाईल. या तपासणीचा अहवाल समाधानकारक आल्यानंतरच कमिन्स पुन्हा आयपीएल खेळण्यासाठी भारतात परतेल. पॅट कमिन्स 3 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना संपल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. आता जर त्याच्या स्कॅनचा रिपोर्ट योग्य आला, तर तो 17 एप्रिलला पुन्हा सनरायझर्स हैदराबादच्या संघात सामील होईल.

​आयपीएल 2026 च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत 2 सामने खेळले असून त्यांच्या खात्यात दोन गुण आहेत. त्यांचा पुढचा सामना (5 एप्रिल) रोजी त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत आपली स्थिती अधिक मजबूत करण्यावर हैदराबादचा भर असेल. यामध्ये त्यांच्यासाठी ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा हे अत्यंत महत्त्वाचे खेळाडू ठरतील, ज्यांनी गेल्या सामन्यात आपल्या फलंदाजीने कमाल दाखवली होती. याशिवाय हेनरिक क्लासेन आणि नितीश रेड्डी यांच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असेल. सनरायझर्स हैदराबादसाठी पिछाडीचा हंगाम अपेक्षेप्रमाणे राहिला नव्हता, परंतु या हंगामात त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची सर्वांना आशा आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports