Friday, 23 Aug, 4.35 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
फिल्डिंग कोच म्हणून निवड न झाल्यानंतर जॉन्टी ऱ्होर्ड्सने दिली ही प्रतिक्रिया

गुरुवारी बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समीतीने भारतीय संघासाठी सपोर्ट स्टाफची निवड केली आहे. यामध्ये क्षेत्ररक्षक प्रशिक्षकासाठी आर श्रीधर यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

यावेळी क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदासाठी मुलाखत दिलेल्या उमेदवारांपैकी दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज क्षेत्ररक्षक जॉन्टी ऱ्होर्ड्स हे एक उमेदवार होते. मात्र त्यांची या पदासाठी अंतिम 3 उमेदवारांमध्येही निवड झाली नाही.

पण ही निवड न होणे हे अपेक्षितच असल्याचे स्पष्ट करताना ऱ्होर्ड्स म्हणाले, 'मला खात्री आहे की माझी मुलाखत सध्याच्या प्रशिक्षकापेक्षा(आर श्रीधर) चांगली गेली नसणार. कारण ते मागील अनेक वर्षापासून संघाबरोबर आहेत.'

'खेळाडूंनी एका योजनेनेच काम केले आहे. तूम्ही त्यांची प्रगती पाहू शकता. ती सहजच झालेली नाही. जर मुलाखतीच्या दृष्टीकोनातून पाहिले तर ते(श्रीधर) माझ्यापेक्षा वरचढ ठरले.'

तसेच टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार चेन्नईत झालेल्या एका कार्यक्रमात भारताच्या क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यामागील कारण सांगताना ऱ्होड्स म्हणाले, 'एक क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून मी 2007 पर्यंत दक्षिण आफ्रिका संघाबरोबर काही वर्षे काम केले. त्यानंतर मी फक्त भारतात काम केले आहे. त्यामुळे मी दक्षिण आफ्रिकेपेक्षा भारतीय क्रिकेट क्षेत्राशी जास्त परिचीत आहे.'

याबरोबरच ऱ्होर्ड्स म्हणाले, 'भारतीय खेळाडू फिट आहेत पण ते अजून त्यांच्या चपळतेत सुधार करु शकतात. आम्ही दक्षिण आफ्रिकामध्ये वाढल्याने अनेक खेळ खेळतो. या सर्व खेळांनीच मला असा क्षेत्ररक्षक बनवले. क्षेत्ररक्षणात हालचाली देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात आणि मला वाटत नाही की यामध्ये भारतीय खेळाडूंनी त्यांचे सर्वोत्तम दिले आहे.'

तसेच जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये गणना होणारे ऱ्होड्स म्हणाले, परदेशात स्लीपमध्ये झेल पकडणे ही भारताची समस्या आहे. जर त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये काही झेल सोडले नसते तर त्यांना तिथे कसोटी मालिका जिंकण्याची संधी होती.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top