Saturday, 26 Oct, 3.12 am महा स्पोर्ट्स

नवे लेख
शैलजा जैन यांची भारतीय कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदी वर्णी, तर बलवान सिंग पुन्हा एकदा प्रशिक्षकपदी

भारतीय कबड्डी पुरुष व महिला संघाच्या प्रशिक्षक पदी एकूण ६ जणांची निवड करण्यात आली आहे. पुरुष संघासाठी बलवान सिंग, अशन कुमार व जैविर शर्मा आणि महिला संघासाठी सुनील दाबास, शैलजा जैन व बानानी साहा यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली आहे.

भारतीय हौशी कबड्डी महासंघाकडून प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. यांसाठी पुरुषाचे २० तर महिलांचे ०९ अर्ज आले होते. सर्व अर्जाचा विचार करून प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेनुसार कबड्डी क्षेत्रातील पात्रता, वय, अनुभव, पुरस्कार आणि कर्तृत्व या सर्वाचा विचार करून ६ जणांची न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) एस पी गर्ग, प्रशासक/अध्यक्ष भारतीय हौशी कबड्डी संघटना यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी निवड केली आहे.

आशियाई स्पर्धा २०१० व २०१४ साली सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि विश्वचषक २०१६ विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून बलवान सिंग यांनी काम केलं आहे. त्यांना द्रोणाचार्य पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. आता ३ वर्षानंतर पुन्हा एकदा त्याची भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच मागील वर्षी जकार्ता इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत इराण महिला कबड्डी संघाला विजेतेपद पटकावून देणाऱ्या प्रशिक्षक शैलजा जैन यांची भारतीय महिला कबड्डी संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झाली आहे. आशियाई स्पर्धेत इराणकडून भारतीय संघाला २४-२७ असा अंतिम सामन्यात पराभवाला समोरे जावे लागले होते.

त्याचबरोबर कबड्डी क्षेत्रातील पहिला पद्मश्री पुरस्कार विजेत्या खेळाडु तसेच द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या सुनील दाबास यांची सुद्धा भारतीय महिला कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. तसेच मागील वर्षी आशियाई स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या दक्षिण कोरिया संघाला अशन कुमार यांनी मार्गदर्शन केले होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top