टीम इंडिया (Team india) पुन्हा एकदा श्रीलंकेच्या मैदानावर कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज आहे. 15 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट 2026 दरम्यान दोन्ही देशांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल, ज्याचे महत्त्व केवळ द्विपक्षीय सामन्यापुरते मर्यादित नसून,या मालिकेत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच WTC 2025-27 चे गुण सुद्धा दाटणीवर असणार आहे.
अशा परिस्थितीत शुबमन गिलच्या (Shubman gill Under captaincy) नेतृत्वाखालील भारतीय संघाचे लक्ष केवळ विजयावरच नाही, तर गुणतालिकेत मोठी झेप घेण्यावरही असेल. मालिकेपूर्वी भारतीय संघ 7 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये चार दिवसांचा सराव सामना खेळेल, जेणेकरून स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेता येईल.
भारत सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या गुणतालिकेत 9 सामन्यांनंतर 52 गुण आणि 48.15 च्या विजय टक्क्यासह पाचव्या स्थानावर आहे. जर टीम इंडियाने श्रीलंकेत शानदार कामगिरी केली, तर न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेपूर्वी त्यांची स्थिती बरीच मजबूत होऊ शकते.
श्रीलंकेच्या मैदानावर भारताचा कसोटी रेकॉर्ड वेळेनुसार सातत्याने सुधारला आहे. 1985 ते 2017 या कालावधीत दोन्ही संघांमध्ये श्रीलंकेत एकूण 24 कसोटी सामने खेळले गेले. यामध्ये भारताने 9 सामने जिंकले, तर 7 सामन्यांत पराभव पत्करावा लागला. तसेच, 8 कसोटी सामने अनिर्णित राहिले. भारताने श्रीलंकेत आपला पहिला कसोटी सामना ऑगस्ट 1985 मध्ये कोलंबोच्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लब (SSC) मैदानावर खेळला होता. तो सामना अनिर्णित संपला होता.
सुरुवातीच्या वर्षांत भारतीय संघाला श्रीलंकेच्या परिस्थितीशी जुळवून घेताना संघर्ष करावा लागला, पण गेल्या दशकात चित्र पूर्णपणे बदलले आहे. भारताला श्रीलंकेत शेवटचा कसोटी पराभव ऑगस्ट 2015 मध्ये गाले येथे स्वीकारावा लागला होता. त्या सामन्यात श्रीलंकेने 63 धावांनी विजय मिळवला होता. तेव्हापासून भारतीय संघाने श्रीलंकेत खेळलेले सर्व 5 कसोटी सामने जिंकले आहेत आणि गेल्या 11 वर्षांत तिथे एकही कसोटी सामना गमावलेला नाही.
विजयाची ही मालिका ऑगस्ट 2015 मध्ये कोलंबोमधील 278 धावांच्या मोठ्या विजयाने सुरू झाली. त्याच मालिकेत भारताने सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदानावर 117 धावांनी आणखी एक विजय मिळवला होता.
भारताने शेवटचा दौरा 2017 मध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली श्रीलंका दौरा केला होता. तो दौरा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात संस्मरणीय परदेशी दौऱ्यांपैकी एक आहे. भारताने गाले कसोटीच्या पहिल्या डावात 600 धावा केल्यावर 304 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर कोलंबो कसोटी एक डाव आणि 53 धावांनी आपल्या नावावर केली आणि नंतर पल्लेकेले येथे एक डाव आणि 171 धावांच्या शानदार विजयासह मालिका 3-0 ने जिंकली. या क्लिन स्वीपने परदेशी जमिनीवर भारताचे वर्चस्व सिद्ध केले आणि श्रीलंकेतील त्यांची अजेय घोडदौडही कायम राखली.
भारताचा जुना रेकॉर्ड अनुकूल असला, तरी यंदाचा सामना आधीपेक्षा अधिक महत्त्वाचा मानला जात आहे. WTC फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला या मालिकेत विजयाची नितांत गरज असेल. दुसरीकडे, श्रीलंकाही घरच्या मैदानाचा फायदा घेऊन आपली स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.

