Friday, 23 Aug, 1.36 am महा स्पोर्ट्स

नवे लेख
टीम इंडियाला मिळाला नवीन बॅटिंग कोच, तर यांना मिळाली फिल्डींग, बॉलिंग कोचची जबाबदारी

गुरुवारी बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समीतीने भारतीय संघासाठी सपोर्ट स्टाफची निवड केली आहे. यामध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संजय बांगर यांच्या ऐवजी भारताचे माजी फलंदाज विक्रम राठोड यांची निवड करण्यात आली आहे. तर भारत अरुण आणि आर श्रीधर यांना अनुक्रमे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून कायम करण्यात आले आहे.

एमएसके प्रसाद प्रमुख असलेल्या निवड समीतीने सोमवारपासून फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, स्ट्रेंथ अँड कंडशनिंग प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक या सपोर्ट स्टाफच्या पदांसाठीच्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या.

या मुलाखतीनंतर प्रत्येक पदासाठी निवड समीतीने 3 अंतिम उमेदवार निवडले होते. या 3 उमेदवारांपैकी अव्वल क्रमांकवर असणाऱ्या उमेदवाराला परस्पर हितसंबंधाची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पदांवर नियुक्त केले जाणार आहे.

2019 विश्वचषकानंतर भारतीय संघाचे सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची उचलबांगडी होणार हे जवळ जवळ निश्चित होते. त्याप्रमाणे त्यांच्या ऐवजी आता फलंदाजी प्रशिक्षक म्हणून विक्रम राठोड यांची निवड करण्यात आली आहे.

विक्रम राठोड यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 कसोटी आणि 7 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी अनुक्रमे 131 आणि 193 धावा केल्या आहेत. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकिर्द जरी खास ठरली नसली तरी त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे.

राठोड यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणीचे 146 सामने आणि अ दर्जाचे 99 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी प्रथम श्रेणीत 11473 धावा आणि अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 3161 धावा केल्या आहेत. यामध्ये त्यांच्या एकूण 40 शतकांचा समावेश आहे.

याबरोबरच राठोड हे 2016 पर्यंत संदिप पाटिल प्रमुख असलेल्या वरिष्ठ निवड समीतीचे सदस्य होते.

तसेच 2019 विश्वचषकानंतर भारतीय संघाची साथ सोडलेले फिजिओथेरपिस्ट पॅट्रिक फऱ्हार्ट ऐवजी निवड समीतीने फिजिओच्या पदासाठी नितीन पटेल यांची निवड केली आहे. ते 2011 च्या विश्वचषकादरम्यान भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग होते.

याबरोबरच स्ट्रेंथ अँड कंडशनिंग प्रशिक्षक पदासाठीच्या उमेदवारांना निवड समीतीने मुलाखतीच्या दुसऱ्या फेरीत त्यांचे प्रॅक्टिकल कौशल्य जाणून घेण्यासाठी बंगळूरुमधील एनसीएमध्ये बोलवण्याचे ठरवले आहे.

तसेच भारतीय संघाला सुनील सुब्रमण्यम ऐवजी गिरीश डोंगरे हे नवे व्यवस्थापक मिळाले आहेत.

निवड समीतीने सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक पदांसाठी निवड केलेले अंतिम उमेदवार -

Screengrab: bcci.tv
Screengrab: bcci.tv
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top