Monday, 13 Jul, 6.14 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
तो सामना जिंकल्यावर माझी ओपन जीपमधून मिरवणुक काढली होती, अमिताभ झाल्यासारखं वाटत होतं

२००२मध्ये याच दिवशी भारतीय संघाने नासीर हुसेनच्या नेतृत्त्वाखालील इंग्लंडला पराभूत करत नेटवेस्ट सिरीज जिंकली होती. अंतिम सामना जिंकताच भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीत टी- शर्ट काढून हवेत फिरवला होता.

या सामन्यात भारतीय विजयाचे शिल्पकार राहिले होते मोहम्मद कैफ व युवराज सिंग. विशेष म्हणजे हा सामना कैफच्या घरचे पाहत नव्हते. ज्यावेळी या सामन्यात सचिन बाद झाला तेव्हा मैदानातील अनेक प्रेक्षक भारत सामना हरणार असे समजून मैदानातून निघून गेले होते. या प्रेक्षकांप्रमाणेच कैफचे कुटुंबियही सचिन बाद झाल्यानंतर टीव्ही बंद करुन घराजवळ असणाऱ्या थेटरमध्ये देवदास चित्रपट पहाण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यावेळी कैफची फलंदाजी लाईव्ह पाहिलीच नाही. पण जेव्हा भारताने हा सामना जिंकला तेव्हा अनेकजण त्यांच्या घरी आले होते. पण कुटुंबिय चित्रपट पहाण्यासाठी गेल्याने घराला कुलुप होते. तेव्हा घरी आलेल्यांना वाटले यांनी मुद्दामहुन कुलुप लावले आहे.

पण जेव्हा त्यांना कळाले की ते चित्रपट पहाण्यासाठी गेले आहेत, तेव्हा सर्वांनी थेटरच्या बाहेर गर्दी केली. अखेर कैफच्या कुटुंबियांना चित्रपट अर्धवट सोडून बाहेर यावे लागले. तेव्हा त्यांना कळाले की कैफने सामना जिंकवला आहे. जेव्हा हा सामना जिंकून कैफ घरी आला तेव्हाही त्याचे मोठ्या उत्साहाने स्वागत झाले होते.

जेव्हा तो घरी परतला होता, तेव्हा त्याची ५-६ किलोमीटर खुल्या जीपमधून मिरवणुक काढण्यात आली होती. लोक रस्त्याच्या कडेला घोषणा देत होते. जवळपास घरी पोहचायला त्याला ४ तास लागले होते. यावेळी लोकं त्याच्या घरी येत होते, कैफची आई त्यांना चहा, नाश्त्याची सोय करत होती. कैफ लहान असताना याच शहरात अशीच मिरवणुक बॉलीवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांची निघाली होती. त्यामुळे हे सर्व पाहून कैफला अमिताभ झाल्यासारखे वाटत होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top