आयपीएलच्या 19 व्या हंगामात 15 वर्षांचा डावखुरा सलामीवीर वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) प्रत्येक सामन्यात नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या 'क्वालिफायर-2' सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले.
न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला संघ अडचणीत असतानाही वैभवने एका बाजूने संयम ठेवून खेळी केली. आपल्या खेळीत त्याने जसे 20 धावा पूर्ण केल्या, तसंच त्याने आयपीएलच्या इतिहासात असा विक्रम केला जो यापूर्वी कोणताही 'अनकॅप्ड' (भारतीय संघासाठी न खेळलेला) खेळाडू करू शकला नव्हता.
आयपीएलच्या 19 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही एका खेळाडूने इतके विक्रम मोडीत काढले नसतील, जेवढे वैभव सूर्यवंशीने या एकाच हंगामात केले आहेत. वैभवने आधीच एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होताच, आता त्याने आणखी एक मोठी मजल मारली आहे. आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात 700 पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला 'अनकॅप्ड' खेळाडू ठरला आहे. तसेच, आयपीएलमध्ये एका हंगामात 700 हून अधिक धावा करणारा तो एकूण 5 वा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी विराट कोहलीने दोनदा, तर साई सुदर्शन, सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल यांनी प्रत्येकी एकदा ही कामगिरी केली आहे.
वैभवच्या फलंदाजीत सर्वाधिक धावा चौकार आणि षटकारांच्या स्वरूपात पाहायला मिळतात. त्याने याआधीच आयपीएलच्या एका हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. गुजरात टायटन्सविरुद्धच्या या सामन्यात पहिल्या 6 षटकांत वैभवने 31 धावा केल्या, ज्यामुळे आयपीएलच्या इतिहासात पॉवरप्लेमध्ये 500 पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. आयपीएल 2026 च्या हंगामात वैभवने पॉवरप्लेमध्ये एकूण 521 धावा केल्या आहेत.

