पाठीच्या दुखापतीनंतर पुनराआगमन बाबत चर्चा सुरू असलेला भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसर्या वनडे सामन्यापूर्वी नेटमध्ये भारतीय संघाबरोबर सराव करेल.
बुमराह स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मायदेशातील मालिका सुरू झाल्यापासून संघाबाहेर आहे. तथापि, तो आता दुखापतीतून बरा होण्याच्या मार्गावर आहे. पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी तंदुरुस्त होण्याची आशा संघ व्यवस्थापनाला आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धचा दुसरा वनडे सामना 18 डिसेंबरला विशाखापट्टणममध्ये खेळला जाईल. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, 'बुमराह भारतीय संघाबरोबर सराव करेल.
आता ही(नेटमध्ये सराव करुन तंदुरुस्ती तपासणे) परंपरा बनली आहे. इंदोर येथे झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटीपूर्वी संघ व्यवस्थापनाने भुवनेश्वर कुमारच्या फिटनेसची चाचणी केली. त्याचप्रमाणे बुमराहची फिटनेस पाहली जाईल.'
'आता अशी परंपरा बनली आहे की जेव्हा एखादा खेळाडू तंदुरुस्त दिसतो, तेव्हा संघ व्यवस्थापन, फिजिओ आणि प्रशिक्षक त्यांची नेट प्रॅक्टिसमध्ये चाचणी करतात', अशी माहिती सूत्रांनी दिली.

