Friday, 18 Jan, 7.16 am महा अपडेट

होम
बाबासाहेब आंबेडकर आणि लोणावळ्यातील ऋणानुबंध प्रभाकर ओव्हाळ यांच्या पुस्तकातून उलगडले - मुख्यमंत्री

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोणावळा : एक अनोखा ऋणानुबंध' या पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोणावळा : एक अनोखा ऋणानुबंध' हे पुस्तक बाबासाहेबांनी लोणावळा येथे व्यतीत केलेल्या संक्षिप्त कालखंडावर मोठा प्रकाश टाकणारे आहे. लेखक प्रभाकर ओव्हाळ यांनी या पुस्तकाच्या लिखाणासाठी मोठी मेहनत घेतली असून सखोल संशोधन आणि अभ्यास केला आहे. पुस्तकातून मिळणारी माहिती अमूल्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोणावळा : एक अनोखा ऋणानुबंध' या पुस्तकाचे प्रकाशन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. झी मीडियाचे मुख्य संपादक विजय कुवळेकर, लेखक प्रभाकर ओव्हाळ, प्राजक्त प्रकाशनचे जालिंदर चांदगुडे, बाबासाहेबांचा सहवास लाभलेले लोणावळा येथील शंकरराव घोलप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र विस्तृत आहे. एका जीवनात अनेक जीवन जगलेले महामानव असा उल्लेख बाबासाहेबांच्या बाबतीत करता येईल. बाबासाहेबांच्या जीवनातील लोणावळ्यातील कालखंड छोटा आहे. पण तो किती अर्थाने समाजस्पर्शी होता हे या पुस्तकातून पुढे आले आहे. तेथील आश्रमात बाबासाहेबांनी व्यतीत केलेला काळ, त्यासाठी केलेला पत्रव्यवहार याची माहिती प्रभाकर ओव्हाळ यांनी संशोधनातून जमा केली. लोणावळावासियांचा ऋणानुबंध या माध्यमातून पुढे आला आहे.

बाबासाहेब राहिलेले लंडन येथील घर खरेदी करण्याकरिता गेलो असता लंडन स्कूल ऑफ इकानामिक्ससारख्या नामवंत महाविद्यालयातील अधिष्ठात्यांनी बाबासाहेबांबद्दल गौरवोद्गार काढले. तेथील विद्यार्थी आजही बाबासाहेबांच्या शोधप्रबंधांचा संदर्भासाठी वापर करतात असे त्यांनी सांगितले. जपानमधील बाबासाहेबांच्या पुतळा अनावरणाप्रसंगीही त्यांच्याविषयीचा आदर अनुभवता आला आहे. बाबासाहेबांची अशी एक वैश्विक प्रतिमा आहे. ती प्रतिमा घडत असताना त्यातील एक छोटासा बिंदू या पुस्तकासाठी निवडण्यात आला. लोणावळा परिसरातील बुद्धकालीन इतिहासाची जाणीव बाबासाहेबांना होती. या छोट्याशा पुस्तकातून मिळणारी माहिती खूप मोठी आणि अमूल्य आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

श्री. कुवळेकर म्हणाले, हे वेगळ्या प्रकारचे पुस्तक आहे. वेगळ्या प्रकारचे संशोधन या पुस्तकाच्या निमित्ताने पुढे आले आहे. हे लेखन व्यावसायिक नाही. तर ते श्री.ओव्हाळांच्या वैचारिक निष्ठेचा भाग मानावा लागेल. हा एक विचारधन संग्रहाचा प्रयत्न आहे. बाबासाहेबांचे हस्ताक्षर, त्यांच्याविषयीचे विविध दस्तऐवज अभ्यासणे हे एखादे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी खूप उपयुक्त ठरणारे आहे. त्याअर्थाने या पुस्तकाचा आशय मोठा आहे, असे ते म्हणाले.

लेखक श्री. ओव्हाळ म्हणाले, बाबासाहेबांविषयी काही अपरिचित घटनांची माहिती, सार या पुस्तकात आहे. लोणावळ्यातील कैवल्यधाम आश्रमातील बाबासाहेबांच्या अनेक आठवणी या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत. व्हू ईज पांडुरंग हे बाबासाहेबांचे हस्तलिखित या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे, असे त्यांनी सांगितले.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Update
Top