मुंबईः राज्याच्या शिक्षण विभागातर्फे शाळांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम आणि योजना, तसेच आतापर्यंत झालेल्या प्रगतीची माहिती, विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली.
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आणि त्यांच्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीत, शिंदे यांनी शाळा दत्तक घ्या आणि त्या शाळांच्या प्रगतीचा साप्ताहिक आढावा घ्या, असे आवाहन केले. आपल्या मतदारसंघातील शाळांच्या विकासासाठी आमदार आणि खासदारांनी शाळा दत्तक घेऊन उपलब्ध निधी आणि स्थानिक संसाधनांच्या माध्यमांतून योगदान द्यावे, यासाठी त्यांना आवाहन करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील नंदनवन या अधिकृत बंगल्यामध्ये तब्बल चार तास ही आढावा बैठक झाली. शिक्षण विभागाने केलेल्या कामांचे त्यांनी कौतुक केले आणि यापुढे योजनाबद्ध मोहिमेद्वारे आतापर्यंत केलेले चांगले काम, राज्यातील प्रत्येक शाळा आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावे, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
ते म्हणाले, की राज्यातील शाळांचे आधुनिकीकरण आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रत्यक्ष दृश्यमान आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी सर्वसमावेशक आणि कालबद्ध कृती आराखडा तयार केला पाहिजे. एकविसाव्या शतकात मुलांच्या इच्छा-आकांक्षांमध्ये परिवर्तन होत आहेत. त्यांची स्वप्नेही बदलत आहेत. त्या अनुषंगाने शाळाही बदलल्या पाहिजेत. प्रत्येक मुलाला भविष्यातील संधी आणि आव्हानांसाठी तयार करणारी आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि भविष्यवेधी शिक्षणव्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे.
या कृती आराखड्यात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांना सोबत घेणे, शिक्षकांसाठी प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि प्रेरणादायी उपक्रम राबवणे तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन व योग्य सन्मान देणे, यावर विशेष भर देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या विविध शिक्षणविषयक योजनांची महाराष्ट्रात प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
शिक्षण म्हणजे केवळ अभ्यासक्रम आणि परीक्षा नसून, विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक विकास हा शिक्षणव्यवस्थेचा केंद्रबिंदू असला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, पोषण, माध्यान्ह भोजन योजनेचा आढावा तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य आणि भावनिक स्वास्थ्यासाठी आवश्यक उपक्रम यांना अधिक महत्त्व देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
शाळांच्या विकासात पालक, माजी विद्यार्थी आणि स्थानिक समाजाची सक्रिय भागीदारी वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. शिक्षण विभागाकडून सुरू असलेले चांगले उपक्रम आणि त्यातून घडणारे सकारात्मक बदल जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी दिले.
शाळांच्या आधुनिकीकरणासाठी उद्योग आणि कॉर्पोरेट क्षेत्रांची व्यावसायिक क्षमता वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिनिधी आणि उद्योगक्षेत्रातील प्रमुखांशी बैठका घेऊन तंत्रज्ञान, प्रशिक्षण, कौशल्य, संसाधने आणि इतर आवश्यक सहकार्य मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित दर आठवड्याला प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. अडचणी दूर करून कामाला गती देण्यासाठी या बैठकीत आवश्यक निर्णय घेतले जातील. शाळा बदलल्या तर विद्यार्थ्यांचे भविष्य बदलेल आणि विद्यार्थ्यांचे भविष्य बदलले तर महाराष्ट्राचे भविष्य बदलेल. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक चांगला उपक्रम मिशन मोडवर पुढे नेऊन त्याचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

