पुणे: शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी बारामतीच्या पोटनिवडणुकीवर भाष्य केले आहे. काँग्रेसच्या बारामती पोटनिवडणुकीत लढवण्यातबाबतच्या निर्णयावर शरद पवार यांना विचारण्यात आले.
यावर बारामती पोटनिवडणूक लढण्यापासून मी काँग्रेसला सांगू शकत नाही. हा निर्णय त्यांचा आहे. निवडणूक लढू नका, असा सल्ला मी देईन, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
शरद पवार म्हणाले, ‘काँगेसचे लढायचं ठरवले आहे. तो राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही त्यांना सांगू शकत नाही. पण ही जागा रिक्त झाली. एका अपघाताने झाली. कर्तुत्वान प्रतिनिधी महाराष्ट्रातून गेला. मला विचारलं तर मी काँग्रेसला सल्ला देईल. ही निवडणूक बिनविरोध करणं योग्य होईल. हा निर्णय काँगेसने घ्यायचा आहे.’
Buy Maharashtrache Dada BookDiscount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
बारामती पोटनिवडणुकीच्या बिनविरोधसंदर्भात अजूनतरी काही निर्णय नाही. काँग्रेस नेते काय तो निर्णय घेतील. रोहित पवारांनी आज पार्थ पवारांनी केलेल्या काँग्रेसबाबातच्या वक्तव्यासंदर्भात हर्षवर्धन सपकाळांकडे दिलगिरीही व्यक्त केली. आत्या म्हणून जो काही सल्ला द्यायचा तो घरात देईन, कॅमेरासमोर नाही, असे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज (गुरुवार) शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, अशी हालचाल सुरु आहे. मात्र काँग्रेसने माघार न घेण्याची ठाम भूमिका घेतल्यामुळे आता बारामतीत निवडणूक होणे जवळपास निश्चित आहे. करुणा मुंडे, अभिजित बिचुकले यांच्यासह एकूण 53 उमेदवारांपैकी काल 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे अजून 47 उमेदवार रिंगणात आहेत. आता आज शेवटच्या दिवशी माघारीच्या सत्रात घडते हे पहाणं महत्वाचे आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.

