Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सिंगापूरसारखा कडक कायदा करून फासावर लटकवा.

सिंगापूरसारखा कडक कायदा करून फासावर लटकवा.

सिंगापूरसारखा कडक कायदा करून फासावर लटकवा…

चेन्नईः अंमली पदार्थांची तस्करी करणारे गुन्हेगार आणि उच्चस्तरीय भ्रष्टाचाराच्या विरोधात सिंगापूरसारखे कठोर कायदे करण्याचा सल्ला, 'झोहो'चे संस्थापक श्रीधर वेंबू यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना दिला आहे.

भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड असून, सर्वसामान्यांचे जीवन दुर्धर बनले आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, असे वेंबू यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमातून केलेल्या पोस्टद्वारे आवाहन केले आहे.

यासंदर्भात वेंबू यांनी ५ प्रमुख मुद्द्यांवर भर दिला आहे. अंमली पदार्थांची तस्करी आणि सर्व थरांत बोकाळलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी सिंगापूरसारखे कठोर कायदे करावे आणि दोषींना मृत्युदंडाची शिक्षा द्यावी. अधिकारी आणि राजकारण्यांच्या पगारात वाढ, भ्रष्टाचार रोखण्यासाठी मंत्री, आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या पगारात भरीव वाढ करावी. जुनी प्रकरणे माफ करावी, जुन्या वादांवर वेळ वाया घालवण्याऐवजी भविष्यात सुधारणा घडवून आणता याव्यात यासाठी पूर्वीच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना माफ करण्यात यावे, अशी शिफारस त्यांनी केली आहे. कायदेशीर प्रक्रियेला गती देण्यात यावी, कठोर कायद्यांनुसार न्याय निःपक्षपाती असावा, परंतु निकाल ३० वर्षांच्या विलंबाने लागण्याऐवजी सिंगापूरमधील न्यायालयांप्रमाणे जलदगतीने दिले जावेत. सिंगापूरचे माजी पंतप्रधान ली कुआन यू यांच्या विचारांचा आणि धोरणांचा अभ्यास करून त्यांची भारतात अंमलबजावणी करण्यात यावी, अशा या पाच शिफारसी त्यांनी केल्या.

वेंबू यांनी केलेल्या सूचनांवर राज्याचे आर्थिक सल्लागार सेंथिल कुमार यांनी टीका केली आहे. केवळ पगार वाढविल्याने भ्रष्टाचार नाहीसा होणार नाही, असे ते म्हणाले. श्रीमंत राजकारण्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याचे मान्य करून ते पुढे म्हणाले, की कनिष्ठ सरकारी कर्मचाऱ्यांकडेही २० कोटी किंवा त्याहून अधिक किंमतीची मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे. हा मुद्दा केवळ पगाराच्या पातळीवरचा नाही तर उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि प्रभावी अंमलबजावणीच्या अभावाचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mahabharat News