मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या दादरमधील नगरसेविका आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत याचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे, त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे.
पालघरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र, हे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले नसल्याचे समितीने नमूद केले आहे. त्यामुळे त्यांच्या नगरसेवकपदाचा निर्णय आता महापालिकेच्या सभागृहात होणार आहे. राऊत यांच्या विरोधात उभ्या असलेल्या आणि पराभूत झालेल्या, शिंदेसेनेच्या प्रिया सरवणकर गुरव यांची निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रिया सरवणकर या सदा सरवणकरांची कन्या आहे.
दादरमधील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या वॉर्ड क्रमांक १९१ मधून विशाखा राऊत आणि प्रिया सरवणकर गुरव यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत प्रिया सरवणकर गुरव पराभूत झाल्या होत्या.
पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे. विशाखा राऊत यांना अपिलासाठी जरी ९० दिवसांचा अवधी आहे. विशाखा राऊत यांचे प्रमाणपत्र मुंबई महापालिकेच्या सभागृहाने रद्द केल्यास, प्रिया गुरव यांची नगरसेविकापदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांची निवड झाल्यास, सभागृहात शिंदेसेनेच्या संख्याबळात एकाने वाढ होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
विशाखा राऊत यांनी कुणबी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं होतं. मात्र कागदपत्रांमधून कुणबी जात प्रमाणपत्रधारकांशी रक्ताचं नातं सिद्ध करता आले नाही, असे समितीने नुकत्याच दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. दरम्यान, या आदेशाविरोधात महाराष्ट्र जात प्रमाणपत्र कायद्यातील तरतुदीनुसार ९० दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे अपील करता येईल. त्यामुळे राऊत यांच्याकडे कायदेशीर आव्हान देण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी आहे.
यासंदर्भात बोलताना विशाखा राऊत म्हणाल्या, आपण आपल्या आजोबांचे, १९११ सालचे पुरावे आणि नोंदी सादर केल्या आहेत. हे पुरावे मोडी लिपीत आहेत. परंतु समितीने ते पुरावे ग्राह धरले नाहीत. महापालिकेच्या जात पडताळणी समितीवर शिंदेसेनेचा दबाव आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला, असा आरोप विशाखा राऊत यांनी केला आहे. जात प्रमाणपत्रांशी संबंधित एकूण ८४ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. परंतु, फक्त आमच्या पक्षाशी संबंधित प्रकरणावर निर्णय दिले जात आहेत, असेही त्याांनी सांगितले.

