Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आयपीएल सामन्यांतील 'सलाम मुंबई'वर आक्षेप

आयपीएल सामन्यांतील 'सलाम मुंबई'वर आक्षेप

MahaeNews 12 hrs ago

मुंबई : आयपीएलच्या मुंबईतील सामन्यांदरम्यान झळकणाऱ्या 'सलाम मुंबई' या घोषणेतील 'सलाम' या शब्दावर आक्षेप घेत त्याऐवजी 'नमस्कार' किंवा 'नमस्ते मुंबई' या शब्दांचा वापर करण्याची मागणी भारतीय जनता पक्षांच्या युवा मोर्चाने केली आहे.

'सलाम' या शब्दाला कवीवर्य मंगेश पाडगावकर यांनी आपल्या 'सलाम' या अजरामर कवितेतून मराठी साहित्य, सांस्कृतिक विश्वात वेगळेच वलय मिळवून दिले आहे. अत्यंत बोचऱ्या आणि तीक्ष्ण शब्दात 'सलाम' ही कविता राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीवर विडंबनात्मक भाष्य करते. हा शब्द मूळ अरबी असला तरी मराठीत आदरयुक्त वंदन, नमस्कार किंवा अभिवादन करण्यासाठी सहज वापरला जातो. उदाहरणार्थ सलाम ठोकणे. या शब्दाच्या वापरावर भाजयुमोचा आक्षेप आहे.

'मुंबईची संस्कृती व ओळख 'सलाम मुंबई' नाही. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेशी सुसंगत 'नमस्कार मुंबई' अथवा 'नमस्ते मुंबई' अशी असली पाहिजे. त्यामुळे 'सलाम मुंबई' हा शब्दप्रयोग तात्काळ बंद करून त्याऐवजी 'नमस्कार' किंवा 'नमस्ते मुंबई' या शब्दांचा वापर करण्यात यावा, अशी मागणी भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष दिपक सिंह यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांना पत्र लिहून केली आहे.

'मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून महाराष्ट्राची भाषा, गौरवशाली संस्कृती, परंपरा जपणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. सार्वजनिक मंचावर महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान राखला गेला पाहिजे. 'सलाम' या शब्दाऐवजी नमस्कार किंवा नमस्ते हे शब्द महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक भावनांचे अधिक योग्य प्रतिनिधित्त्व करतात,' असे सिंह यांनी या पत्रात नमूद केले आहे. आयपीएल किंवा इतर कोणत्याही क्रिकेट सामन्यात 'सलाम मुंबई' या घोषणांचे प्रसारण पूर्णतः बंद करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. मोठ्या स्क्रीनवर 'जय महाराष्ट्र' सारखे संदेश प्रदर्शित केल्यास राज्याच्या अस्मिता आणि जनभावनांचा अधिक योग्य सन्मान होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews