Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अपयशाची भीती बाळगू नका, सकारात्मक विचार करा, नक्कीच यश मिळेल; सिध्दार्थ जाधव

अपयशाची भीती बाळगू नका, सकारात्मक विचार करा, नक्कीच यश मिळेल; सिध्दार्थ जाधव

MahaeNews 2 weeks ago

पिंपरी, पुणे | जीवनात कधीही न्यूनगंड आणि अपयशाची भीती बाळगू नका. नेहमी प्रयत्नशील रहा, धाडसी बना. कोणतीही कृती पूर्ण क्षमतेने, समर्पण भावनेने आणि सकारात्मक विचाराने केल्यास नक्कीच यश मिळेल, असा सल्ला सुप्रसिध्द मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याने तरूणाईला दिला.

चिंचवड येथे प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि दिशा सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'सिद्धार्थ जाधवशी दिलखुलास गप्पा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात सिध्दार्थने विद्यार्थ्यांशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरेही दिली.

यावेळी प्रतिभा इन्स्टिट्यूटचे संस्थापक सचिव दीपक शहा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वनिता कुऱ्हाडे, दिशा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर यांच्यासह राजेंद्र करपे, गोरख भालेकर, सचिन साठे, नाना शिवले, संतोष बाबर, अविनाश ववले, नंदकुमार कांबळे, संतोष चांदेरे आदी उपस्थित होते.

सिध्दार्थ म्हणाला की, मला माझ्या दिसण्याचा न्यूनगंड होता. स्वतःमध्ये आहे. ते प्रथम स्वीकारावे आणि स्वतःवर प्रेम करायला शिकले पाहिजे. मला माझा 'आरसा' देखील प्रेरणा देतो. स्वतःच्या क्षमता ओळखता आल्या पाहिजे. कोणतीही कृती करताना सर्वस्व झोकून दिले द्या व समर्पण भावनेने करा. ते तुमच्यासाठी सर्वोत्तमच असेल. जीवनात आपण नेहमी दुसऱ्यांच्या विचारांनुसार वागू लागतो, ते चुकीचे आहे.

सिध्दार्थ म्हणाला, जगात तुमचे आई-वडील हेच तुमचे 'बेस्ट फ्रेंड' आहेत. त्यांना कधी 'इमोशनल ब्लॅकमेल' करू नका. त्यांच्याशी नेहमी आदरयुक्त संवाद ठेवा. माझे आई-वडील माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. महाराष्ट्र शासनाने मला व्यसनमुक्तीचा 'ब्रँड अँबेसिडर' केले, हा माझ्या आई-वडिलांचा व त्यांनी माझ्यावर केलेल्या संस्काराचा सन्मान होता, असे मी मानतो.

मलेशियात 'आरकेएल गॅलेक्सी'च्या विद्यार्थ्यांची सुवर्णमय कामगिरी!

सर्वच क्षेत्रात अपयश असते, परंतु ते कायमस्वरूपी नसते, त्यातून निराश व्हायचे नाही. दारू, सिगारेट सारख्या व्यसनांपासून दूर राहायचे आणि नैराश्यात कधीही आत्महत्येचा विचार करायचा नाही, असे तो म्हणाला.

रूप, सौंदर्य हे नश्वर आहे. आपल्या कर्तुत्वातून आपले वलय निर्माण करावे. मला एफटीआयआय किंवा ललित कला केंद्रात प्रवेश मिळाला नाही. मला द्रोणाचार्य मिळाले नाहीत. मात्र, मी अनुभवाच्या जोरावर एकलव्य होऊ शकलो, अशा भावना सिध्दार्थने व्यक्त केल्या.
प्रास्ताविक नाना शिवले यांनी केले. सूत्र संचालन डॉ. रवींद्र निरगुडे यांनी व आभारप्रदर्शन सुरेखा कुंभार यांनी मानले.

सिध्दार्थ जाधवने 'ॲनिमल' नाटकातील काही संवाद व प्रसंगांचे यावेळी सादरीकरण केले. याविषयी तो म्हणाला की, आई, वडील आणि गुरुजनांकडून आपल्यावर वेळोवेळी संस्कार होत असतात. मात्र, काही लोक मानवाचा जन्म मिळून देखील जनावराप्रमाणे वर्तणूक करतात. चार वर्षाच्या बालिकेपासून ते म्हाताऱ्या महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना 'माणूस' म्हणायचे का ?, असा सवाल त्याने केला.

'ॲनिमल' या नाटकात याच ज्वलंत विषयावर आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा आशय मांडण्यात आला आहे, असे सांगून हे नाटक सर्वांनी सहकुटुंब पाहून बोध घेतला पाहिजे, असे आवाहन त्याने केले.

चित्रपट क्षेत्रातील माझे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. मागे वळून पाहताना उराशी बाळगलेली अनेक स्वप्नं पूर्ण झाल्याचे समाधान आहे, असे सिध्दार्थ म्हणाला.

माझे वडील बीएमसीमध्ये कामाला होते. मुंबईत घर घेणे म्हणजे दिवास्वप्नं होते. परंतू कष्टाने वयाच्या २६ व्या वर्षी 'रामचंद्र जाधव' यांच्या नावाची पाटी लावून नवीन घरात गृहप्रवेश केला. तसेच 'ताराराम' या नावाने निर्मिती संस्था स्थापन करून 'ॲनिमल' नाटक सुरू केले.

भरत जाधव, केदार शिंदे, अंकुश चौधरी, महेश मांजरेकर, अमित भंडारी व इतर अनेक मित्रांचे, हितचिंतकांचे माझ्या आयुष्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. दिग्दर्शकांनी माझ्याकडून उत्कृष्ट काम करून घेतले. प्रत्येकांकडून मला खूप शिकायला मिळाले, अशा भावना सिध्दार्थने यावेळी व्यक्त केल्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews