पिंपरी-चिंचवड : एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, आळंदी येथे 'एआय इनोव्हेशन क्लब' या नवीन उपक्रमाचे रविवारी थाटात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात सर्व शाखांतील सुमारे ९४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.
यावेळी क्लबच्या उद्दिष्टांची आणि आगामी वर्षभराच्या नियोजित उपक्रमांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते एआय तज्ज्ञ श्री. तुषार कुटे यांचे मार्गदर्शन. 'एआय युग सुरू झाले आहे — तुम्ही भविष्यासाठी तयार आहात का?' या विषयावर बोलताना त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची मूलभूत तत्त्वे, विविध एआय साधने व त्यांचे उपयोजन, या क्षेत्रातील करिअर संधी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने वापर या मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांनी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या समारोपाच्या सत्रात 'एआय व्हिडिओ मेकिंग स्पर्धा' घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले लघुपट सादर केले. संकल्पनेची स्पष्टता, सर्जनशीलता, तांत्रिक कौशल्य आणि सादरीकरण या निकषांवर परीक्षकांनी प्रवेशिकांचे मूल्यमापन केले. स्पर्धेत एफ.वाय.एम.एस्सी.(आयटी)चा विद्यार्थी सोहम एम. पाटांगे याने प्रथम, तर एस.वाय.बी.एस्सी.(सीएस)ची विद्यार्थिनी पूनम कैलास काळे हिने द्वितीय क्रमांक पटकावला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्लब समन्वयक डॉ. कांचन राठी, विद्यार्थी कल्याण विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील महाजन आणि संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांचे मार्गदर्शन लाभले. 'निर्माण करा. नवोन्मेष घडवा. एआयसह भविष्याची कल्पना करा!' या घोषवाक्यासह एआय इनोव्हेशन क्लबच्या आगामी उपक्रमांना विद्यार्थ्यांकडून मोठ्या उत्साहाने प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

