Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला रवाना; महायुतीत हालचालींना वेग

एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला रवाना; महायुतीत हालचालींना वेग

MahaeNews 22 hrs ago

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अधिकच तीव्र झाल्याचं चित्र दिसत आहे. काही जागांवर एकमत झालं असलं तरी अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांवर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी दावा कायम ठेवला आहे.

अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीतील १७ जागांपैकी तब्बल ७ जागांसाठी शिंदे गट आग्रही आहे. विशेषतः ठाणे, संभाजीनगर, जालना, नाशिक या जागांवर शिवसेनेचा जोरदार दावा असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातही ठाणे मतदारसंघाबाबत शिंदे गट अत्यंत ठाम असल्याची चर्चा आहे.

आज सकाळी मुंबईतील नंदनवन निवासस्थानी चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर सुनील तटकरे यांनीही शिंदेंशी चर्चा केल्याची माहिती समोर आली. या बैठकीत जागावाटपावर अंतिम तोडगा न निघाल्याने आता हा निर्णय दिल्ली दरबारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत शिंदे जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत. महायुतीमध्ये आगामी निवडणुकीपूर्वी कोणताही तणाव वाढू नये यासाठी वरिष्ठ स्तरावर समन्वय सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, 'सध्या ज्या पक्षाकडे जागा आहे ती त्यांनाच देण्याचा विचार सुरू आहे. त्यानंतर संख्याबळानुसार निर्णय घेतला जाईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही हाच फॉर्म्युला वापरण्यात आला होता.'

मात्र, त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्याने महायुतीतील जागावाटप अजूनही पूर्णतः अंतिम झालेलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आता दिल्लीतील बैठकीनंतर महायुतीचा अंतिम फॉर्म्युला काय ठरणार आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews