धाराशिव : कळंब नगर परिषद पाठोपाठ आता धाराशिव नगर परिषदेतील राजकीय समीकरणे बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील तब्बल पाच नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती असून, गुरुवारी त्यांच्या पक्षप्रवेशाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या राजकीय घडामोडीमागे मल्हार पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा असून, संबंधित नगरसेवकांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात आल्याचे समजते.
नगरसेवकांना कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा लाभ, काही काळासाठी उपाध्यक्षपदाची संधी आणि स्थानिक पातळीवर विकासकामांमध्ये सहभाग, अशा स्वरूपाचे आश्वासन देण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. विशेष म्हणजे, नगर परिषदेत स्पष्ट बहुमत असतानाही सत्तेच्या सारीपाटावर सुरू असलेल्या या हालचालींमुळे धाराशिवच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी झाली आहे.
या घडामोडीचा सर्वाधिक राजकीय परिणाम शिवसेना (उबाठा) गटासह खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर होण्याची शक्यता आहे. ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटात गेल्यानंतर उबाठा गटातील नगरसेवक त्यांच्या सोबत येतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, पाच नगरसेवक भाजपच्या वाटेवर गेल्यास ही शक्यता सध्यातरी फोल ठरणार असल्याचे चित्र आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय ताकद ही विकासकामे आणि निधीच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाते. नगर परिषद तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकासकामांचा 'वाटा' मिळवायचा असेल, तर नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि स्वतःचा मजबूत राजकीय गट आवश्यक असल्याचा संदेश या घडामोडीतून दिला जात असल्याची चर्चा आहे.
दरवर्षी विकासकामांच्या निधीवरून होणारे राजकीय मतभेद आणि 'वाट्या'साठी सुरू असलेली रस्सीखेच टाळण्यासाठी संबंधित 'शिलेदारां'नाच आपल्या बाजूला करून घेण्याची रणनीती आखण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या संपूर्ण राजकीय हालचालीकडे 'वन टाइम सेटलमेंट' अर्थात OTS (One Time Settlement) म्हणूनही पाहिले जात आहे.
धाराशिव नगर परिषदेत पाच नगरसेवकांनी पक्षांतर केल्यास केवळ पक्षीय संख्याबळाचे गणित बदलणार नाही, तर आगामी काळातील विकासकामे, निधीचे राजकारण आणि स्थानिक नेतृत्वाच्या प्रभावावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संभाव्य पक्षप्रवेशाकडे धाराशिवच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, संबंधित नगरसेवकांचा अधिकृत पक्षप्रवेश झाल्यानंतरच या घडामोडींमागील राजकीय समीकरणे आणि पुढील रणनीती स्पष्ट होणार आहे.

