Tuesday, 20 Apr, 2.04 pm MahaeNews

पिंपरी - चिंचवड
माथाडी कामगार संघटनेच्या नावाखाली एमआयडीत हप्ता वसुली, खंडणी बहाद्दरांना अटक

पिंपरी |महाईन्यूज|

माथाडी कामगार संघटनेच्या नावाखाली हप्ता वसुली करणाऱ्या खंडणी बहाद्दरास अटक करण्यात आली आहे. हे खंडणी बहाद्दर कंपनीत कामगार पुरावल्याचे सांगून कंपन्यांकडून माथाडी कामगार संघटनेच्या नावाने खंडणी उकळत होते. कंपन्यांनी नकार दिल्यास थेट कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना दम देण्यापर्यंत मजल गेली होती.

काळुराम उर्फ अजय शंकर कौदरे (वय 39), कैलास शंकर कौदरे (वय 42, रा. खारोशी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे एमायडीसी अंतर्गत कंपन्यांमध्ये माथाडी संघटनेच्या नावाखाली हप्ता वसुली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार चौकशी केली असता, आरोपी अजय कौदरे हा माथाडी कामगार संघटनेच्या नावाखाली कामगार पुरविल्याचे भासवून कंपन्यांकडून खंडणी स्वरूपात हप्ता वसूल करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी संबंधित कंपनी प्रशासनामधील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली. आरोपी अजय चौधरी व त्याचे साथीदार यांनी कंपन्यांमध्ये येऊन संघटनेचे कामगार कंपनीत प्रत्यक्ष कामास नसताना ते कामावर असल्याचे दाखवून खंडणी वसूल करीत असल्याचे उघडकीस आले.

'याबाबत कोठे वाच्यता केल्यास तुमची वाट लावीन तुमच्यापैकी एखाद्याला जीव गमवावा लागेल. या भागात कंपनी कशी चालवता ते बघून घेईन' अशी धमकीही आरोपी अजय कौदरे याने कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना दिली असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली नसल्याचे पोलिसांना पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन सांगितल्यानंतर त्यांनी तक्रार केली. त्यानुसार अजय कौदरे व त्याचे साथीदार यांच्याविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून माथाडीच्या नावाखाली खंडणी घेणाऱ्या आरोपी अजय व कैलास कौदरे या दोघांना अटक केली.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे, सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय गुळींग, उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी चंदू गवारी, राजू कोणकेरी, राजू जाधव, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, शिवाजी लोखंडे, संतोष काळे, हिरामण सांगळे, श्रीधन इचके, शरद खैरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews
Top