आळेफाटा : पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी (दि. २७) पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन ठामपणे त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक पावले उचलण्यात आली असून, पोलिसांकडून योग्य दिशेने तपास सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले. घटनेच्या दिवशीच पोलिसांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सुनेत्रा पवार यांनी पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. मनोधैर्य योजनेअंतर्गत १० लाख रुपयांची आर्थिक मदत कुटुंबाच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शबरी गुरुकुल योजनेअंतर्गत तरतूद करून कुटुंबाला घरकुल उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.
पीडित कुटुंबातील मुलांच्या भवितव्याची शासन काळजी घेणार असून, भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले. ग्रामस्थांच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवून त्यावर सकारात्मक निर्णयासाठी पाठपुरावा करण्याचेही त्यांनी सांगितले.
भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पिंपळवंडी परिसरात सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आश्वासन देण्यात आले. गावात तातडीने हायमॅक्स दिवे बसविण्यासह सीसीटीव्ही कॅमेरे आणि आवश्यक विद्युत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
गंभीर गुन्ह्यांतील पीडित कुटुंबांना बिबट्याच्या हल्ल्यातील पीडितांप्रमाणे आर्थिक मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार शरद सोनवणे, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, उपविभागीय अधिकारी अर्चना तांबे, तहसीलदार रंजीत भोसले, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

