Dailyhunt
पिंपळे सौदागरमध्ये रखडलेला १८ मीटर रस्ता लवकरच मार्गी!

पिंपळे सौदागरमध्ये रखडलेला १८ मीटर रस्ता लवकरच मार्गी!

MahaeNews 2 weeks ago

पिंपळे सौदागर : अल्कोव सोसायटीमागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या १८ मीटर रस्त्याच्या कामाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. स्थानिक नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

या पाहणी दौऱ्यात नगरसेविका अनिताताई काटे आणि नगरसेविका कुंदाताई भिसे यांनीही सक्रिय सहभाग घेत सकारात्मक पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट केले. संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेत रखडण्यामागील तांत्रिक अडचणींची चर्चा करण्यात आली.

राडारोडा व अस्वच्छतेवर कठोर भूमिका

रस्त्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेल्या राडारोड्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आले. यावर शत्रुघ्न काटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, 'काम पूर्ण होईपर्यंत परिसरात राडारोडा साचू देऊ नका आणि नियमित स्वच्छता राखा,' अशा स्पष्ट सूचना प्रशासन आणि कंत्राटदाराला दिल्या.

नागरिकांशी संवाद, समस्यांवर चर्चा

कुंजीर कॉलनी परिसरातील रहिवाशांशी संवाद साधत विविध विकासकामांची माहिती देण्यात आली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या आणि सूचनांवर सकारात्मक प्रतिसाद देत त्या लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन तिन्ही पदाधिकाऱ्यांनी दिले.

लवकरच रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार

'पिंपळे सौदागरमधील पायाभूत सुविधा मजबूत करणे हे आमचे प्राधान्य आहे. प्रलंबित कामांमुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेत हा १८ मीटर रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल,' असे शत्रुघ्न काटे यांनी सांगितले. या पाहणीवेळी महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

'पिंपळे सौदागरमधील नागरिकांना अपूर्ण कामांमुळे कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही. अल्कोव सोसायटीमागील १८ मीटर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून तो लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला केला जाईल. यासाठी प्रशासनासोबत सतत पाठपुरावा सुरू असून गुणवत्ता आणि वेळेची कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

- शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजपा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews