मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांची उद्या किंवा परवा भेट घेणार असून, पुढील 24 तासांत योग्य निर्णय घेऊ, असे सामंत यांनी सांगितले.
शासन मराठा समाजाच्या मागण्यांसोबत आहे. मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण मनोज जरांगे यांच्या संपर्कात असल्याचेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील यांच्याशी आपले मैत्रीचे संबंध असून ते राजकारण आणि आंदोलनाच्या पलीकडचे आहेत, असे सामंत म्हणाले. त्यामुळे कोणाच्या गैरसमजामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल चुकीचे बोलू नये, अशी विनंती आपण जरांगे यांना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही गैरसमज ठेवू नये आणि ते दूर करावेत, असे आवाहन सामंत यांनी केले.
'शासन मराठा समाजाच्या मागण्यांसोबत आहे. मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी मी जरांगे यांच्या संपर्कात आहे,' असे सामंत यांनी स्पष्ट केले.
'शेतकरी मेळावा जरांगेंना काउंटर करण्यासाठी नव्हता'
परभणीत झालेल्या युवा संवाद आणि शेतकरी मेळाव्याबाबतही उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले. मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू असल्याने एकनाथ शिंदे यांचा मेळावा आयोजित करण्यात आला, असा जरांगे यांचा गैरसमज असेल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे, असे सामंत म्हणाले.
हा कार्यक्रम दोन महिन्यांपूर्वीच नियोजित करण्यात आला होता. 7 जुलै रोजी हा कार्यक्रम होणार होता; मात्र एकनाथ शिंदे आजारी असल्यामुळे त्यावेळी कार्यक्रम होऊ शकला नाही. त्यामुळे कोणालाही काउंटर करण्यासाठी किंवा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शंका निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नव्हता, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
शेतकरी मेळाव्यातून मराठा समाजाला कमी लेखण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.
'जरांगेंनी प्रकृतीची काळजी घ्यावी'
एकनाथ शिंदे यांनी काल आपल्याला फोन केला होता. त्यावेळी आंदोलन होत राहतील आणि मागण्यांवरही निर्णय घेतले जातील; मात्र मनोज जरांगे यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे, असे शिंदे यांनी सांगितल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
'असे सांगणारे नेतृत्व हे शिवसेनेचे नेतृत्व आहे. त्यामुळे जरांगे यांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो खोटा आहे. जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबतचा गैरसमज दूर करावा,' असे सामंत म्हणाले.
एकनाथ शिंदे यांची भूमिका मराठा समाजाला आरक्षण देण्याची राहिली आहे. ते मराठा आरक्षणाच्या मार्गात अडथळा निर्माण करणारी भूमिका कधीच घेणार नाहीत, याची खात्री मनोज जरांगे यांनी बाळगावी, असेही सामंत यांनी सांगितले.
खासदार संजय जाधव यांनीही वेळोवेळी मनोज जरांगे यांच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत संवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

