- मंडप व्यावसायिकांचे प्रश्न विधानसभेत मांडल्याबद्दलही विशेष गौरव
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
पंढरपूर : कै. क्रांतिवीर वसंतदादा बडवे यांच्या ४१ व्या पुण्यस्मरणानिमित्त आमदार महेश लांडगे यांना 'क्रांतिवीर वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार' प्रदान करून गौरविण्यात आले.
क्रांतिवीर वसंतदादा बडवे ट्रस्ट आणि पंढरपूर हिंदू महासभा यांच्या वतीने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आयोजित सोहळ्यात ह.भ.प. श्री. चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच सोहळ्याचे औचित्य साधून मंडप व्यावसायिकांच्या प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडल्याबद्दल पंढरपूर मंडप असोसिएशनच्या वतीनेही लांडगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
११ हजार रुपये, कुंडलिनी-कृपाणांकित भगवा ध्वज, मानाची शाल आणि सन्मानचिन्ह असे हिंदुत्व शौर्य पुरस्काराचे स्वरूप होते. हा सन्मान राष्ट्रभक्ती, हिंदुत्वनिष्ठा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ करणारी प्रेरणा असल्याची भावना आमदार लांडगे यांनी व्यक्त केली.
सोहळ्यास हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभयसिंह कुलकर्णी, हिंदू महासभेचे अध्यक्ष विवेक बेनारे, नगरसेवक सौरभ थिटे पाटील, नगरसेवक भागवत बडवे, नगरसेवक ओंकार जोशी, वारकरी संप्रदायाचे पाईक रामकृष्ण महाराज वीर, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे मुख्य पुजारी शंकर महाराज बडवे आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांतून प्रेरणा घेत क्रांतिवीर वसंतदादा बडवे यांनी राष्ट्र, धर्म आणि समाजासाठी समर्पित भावनेने कार्य केले. त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार स्वीकारण्याचा क्षण अत्यंत भाग्याचा, अभिमानाचा आणि आयुष्यभर प्रेरणा देणारा असल्याचे लांडगे यांनी सांगितले.
या पुरस्कारामुळे सामाजिक कार्याची जबाबदारी आणखी वाढल्याचे नमूद करत, राष्ट्रभक्तीचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि हिंदुत्वनिष्ठ सामाजिक कार्याला बळ देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला
मंडप व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देण्याची मागणी
राज्यातील लाखो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाशी निगडित असलेल्या मंडप व्यवसायाच्या प्रश्नांकडे पावसाळी अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधल्याबद्दल पंढरपूर मंडप असोसिएशनने आमदार लांडगे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मंडप व्यवसायाला उद्योगाचा आणि अत्यावश्यक सेवेचा दर्जा मिळावा, तसेच व्यावसायिकांना शासकीय योजना, आर्थिक सवलती आणि विविध कल्याणकारी सुविधांचा लाभ मिळावा, अशी मागणी लांडगे यांनी विधानसभेत केली होती. या विशेष सन्मानावेळी पंढरपूर मंडप असोसिएशनचे अध्यक्ष भगवानभाऊ मनमाडकर, उपाध्यक्ष खंडू नाना निकते, खजिनदार व प्रांतिक सदस्य श्रीमंत गाजरे, सचिव प्रशांत बडवे, सदस्य सुरेश परचंडे, आदित्य जोशी, सागर स्वामी आणि शरद राजगुरू आदी उपस्थित होते. मंडप व्यावसायिकांनी केलेला सन्मान त्यांच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने काम करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे लांडगे यांनी सांगितले. मंडप व्यावसायिकांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी आणि रोजगाराच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. या दोन्ही सन्मानांबद्दल आमदार लांडगे यांनी क्रांतिवीर वसंतदादा बडवे ट्रस्ट, पंढरपूर हिंदू महासभा, पंढरपूर मंडप असोसिएशनचे पदाधिकारी आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
'क्रांतिवीर वसंतदादा बडवे यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार राष्ट्रभक्ती आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ करणारी प्रेरणा आहे. मंडप व्यावसायिकांनी केलेला सन्मानही त्यांच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने काम करण्याचे बळ देणारा आहे. जनसेवेचा संकल्प अधिक दृढ करत समाजातील विविध घटकांच्या हक्कांसाठी सदैव प्रयत्नशील राहीन.'
- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

