Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सांगवी जिल्हा रुग्णालयाचे 'सुपर स्पेशालिटी'त रूपांतर - शंकर जगताप

सांगवी जिल्हा रुग्णालयाचे 'सुपर स्पेशालिटी'त रूपांतर - शंकर जगताप

MahaeNews 1 week ago

पिंपरी : सांगवी जिल्हा रुग्णालय अधिक सक्षमपणे चालवण्यासाठी आणि या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी आमदार शंकर जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांनी शनिवारी रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन सोयी-सुविधांची पाहणी केली. आगामी काळात सांगवी जिल्हा रुग्णालयाचे रूपांतर 'सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल' मध्ये केले जाईल, अशी महत्त्वपूर्ण ग्वाही त्यांनी यावेळी दिली. रुग्णालयातील यंत्रसामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून ती अधिक गतिमान करण्यासाठी आमदार जगताप यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

सांगवी जिल्हा रुग्णालयामध्ये शनिवारी डॉ. प्रकाश अबिटकर यांनी भेट दिली. यावेळी आमदार शंकर जगताप यांनी त्यांना रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा दिला. यावेळी आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, सहसंचालक डॉ.सुनिता गोलाईत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने उपस्थित होते. रुग्णालयातील आरोग्य सेवा, रुग्ण सुविधा, औषधसाठा, तसेच उपचार व्यवस्थेचा यावेळी त्यांनी सविस्तर आढावा घेतला. विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी करून सद्यस्थिती जाणून घेतली तसेच आवश्यक सुधारणा व तातडीच्या उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.

यावेळी बोलताना डॉ. आबिटकर म्हणाले, 'सांगवी जिल्हा रुग्णालयात सध्या पुरेशा प्रमाणात आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध आहे. ही यंत्रसामग्री अधिक प्रभावीपणे आणि गतिमान पद्धतीने रुग्णांच्या सेवेत कशी वापरता येईल, यासाठी आमदार शंकर जगताप यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातील. रुग्णालयाचा दर्जा उंचावून सामान्य माणसाला खाजगी हॉस्पिटल्सच्या तोडीस तोड मोफत आणि दर्जेदार उपचार मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे.'या भागातील नागरिकांना किरकोळ किंवा गंभीर आजारांच्या उपचारासाठी मुंबई किंवा इतर मोठ्या शहरांतील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागू नये, अशी आमदार जगताप यांची भूमिका आहे . सुपर स्पेशालिटी दर्जा मिळाल्यास रुग्णालयात हृदयरोग, मेंदूविकार, किडनी विकार यांसारख्या गंभीर आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार होण्याचा मार्ग मोकळा होइल असे डॉ. आबिटकर यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

पिंपरी-चिंचवड तसेच लगतच्या ग्रामीण परिसरातील सर्वसामान्य, गरीब रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये किंवा महागड्या खाजगी रुग्णालयांमध्ये जावे लागू नये, हे आमचे स्वप्न आहे. आज आरोग्यमंत्र्यांनी सांगवी रुग्णालयाची पाहणी करून या रुग्णालयाला 'सुपर स्पेशालिटी' दर्जा देण्याची जी ग्वाही दिली आहे, बद्दल मी त्यांचा आभारी आहे. यामुळे हृदयरोग, किडनी आणि मेंदूविकारासारख्या गंभीर आजारांवर गोरगरिबांना मोफत आणि दर्जेदार उपचार मिळतील. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 'आत्मनिर्भर आणि सुदृढ भारत' या स्वप्नाला अनुसरून, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रात आरोग्याच्या सोयी-सुविधा बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.' याच कटीबद्धतेसह आम्ही काम करत आहोत.

- शंकर जगताप आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews