Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शालेय शिक्षण विभागातील विविध विषयांचा मंत्री दादा भुसे यांनी घेतला आढावा

शालेय शिक्षण विभागातील विविध विषयांचा मंत्री दादा भुसे यांनी घेतला आढावा

MahaeNews 1 week ago

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदांच्या अनेक शाळा ज्ञानदानाचे उत्कृष्ट कार्य करीत आहेत. त्यांचा आदर्श घेऊन सर्वच शासकीय शाळांचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्याचे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

2026-27 हे शैक्षणिक वर्ष सुरू होताना विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करणे तसेच विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी दर्जेदार गणवेश देणे यावरही त्यांनी भर दिला.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आदी या बैठकीस उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, मागील वर्षी शाळा प्रवेशोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांच्यासह शासकीय अधिकारी यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत केले. याही वर्षी विद्यार्थ्यांचे स्वागत त्याच जोमाने करण्यात यावे. शाळा सुरू होण्यापूर्वी परिसर स्वच्छतेचे योग्य नियोजन करावे. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गणवेश दर्जेदार असावे. बालभारतीमार्फत 80 टक्के पुस्तके शाळांपर्यंत पोहोचली असून उर्वरित पुस्तके शाळा सुरू होण्यापूर्वी पोहोचतील याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वच्छतागृहे, शाळेची रंगरंगोटी, दुरुस्ती, विद्यार्थीनींसाठी पिंक रुमची व्यवस्था याबरोबरच विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देण्याची सूचना मंत्री भुसे यांनी केली. जवाहर बालभवनप्रमाणे शाळांमधून कला, अभिनय, संगीत, वक्तृत्व आदी बाबींवर भर देण्यात यावा. शाळांच्या विकासासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीबरोबरच माजी विद्यार्थी संघाचे सहकार्य घेण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळांच्या आवारात सुरू कराव्यात, यामुळे पुढे शाळांमधील विद्यार्थीसंख्या वाढण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. शाळांमधून विद्यार्थी सुरक्षा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

दौंड तालुक्यातील गरदरेवाडी येथील शाळेचे उदाहरण देऊन अशा शाळांचा तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा इतर शाळांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन मंत्री दादाजी भुसे यांनी केले. शिक्षकांची पदे भरण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, शाळा समित्यांच्या सदस्यांनी नियमित बैठका घेऊन प्रभावी काम करावे, शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी शाळांना नियमित भेट द्यावी अशा सूचनाही त्यांनी केल्या.

सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे अनिवार्य आहे, याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे वृक्ष लागवडीचे आवाहन आणि राज्य शासनाचा 300 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प या अनुषंगाने शाळांमध्ये 'एक पेड मा के नाम' हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा, अशी सूचना मंत्री भुसे यांनी केली. मागील वर्षी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायतीने विश्वविक्रम केला, याबद्दल तसेच देशव्यापी पीजीआय (परफॉर्मन्स ग्रेड इंडिकेटर) मानांकनामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल त्यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews