मुंबई : ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, आता भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त केल्याने बळीराजाला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
विशेषतः विदर्भ आणि त्याला लागून असलेल्या भागांत पुढील दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
ओडिशाहून पश्चिमेकडे सरकणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचा तसेच दक्षिण गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्रादरम्यान निर्माण झालेल्या वाऱ्याच्या द्रोणीय रेषेचा परिणाम राज्याच्या हवामानावर होणार आहे. २ सप्टेंबरच्या संध्याकाळपासून उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, ३ ते ५ सप्टेंबरदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.
पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार
नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, २ ते ४ सप्टेंबरदरम्यान पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस होऊ शकतो. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर तसेच नागपूरच्या काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व विदर्भात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सप्टेंबरमध्येही पावसाची तूट कायम राहण्याची शक्यता
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात विदर्भातील बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गोंदिया, भंडारा तसेच गडचिरोली आणि चंद्रपूरच्या लगतच्या काही भागांचा अपवाद वगळता उर्वरित विदर्भात सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, गंगीय पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशाच्या लगतच्या भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे २ ते ४ सप्टेंबरदरम्यान पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढू शकतो.
विदर्भात २२ टक्के पावसाची तूट
नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांच्या माहितीनुसार, १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण विदर्भात सरासरीच्या तुलनेत २२ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये ही तूट ३० ते ४० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
सप्टेंबरमध्ये पावसाची शक्यता असली तरी संपूर्ण महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने ऑगस्टमधील पावसाची मोठी तूट पूर्णपणे भरून निघण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत होणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी कितपत दिलासा देतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

