Friday, 24 Sep, 10.34 am MahaeNews

आंतरराष्ट्रीय
सुरक्षाविषयक त्रिराष्ट्रीय आघाडीत भारताला घेण्यास अमेरिकेचा नकार

वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारताला मोठा धक्का देणारा निर्णय जाहीर केला आहे. ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाशी अलिकडेच केलेल्या सुरक्षा भागीदारीत 'ऑकस' (एयूकेयूएस) अमेरिकेने भारत किंवा जपानला सहभागी करण्यास नकार दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी १५ सप्टेंबरला त्रिराष्ट्रीय सुरक्षा भागीदारी असणाऱ्या आघाडीची घोषणा केली होती. या भागीदारीनुसार ऑस्ट्रेलियाला प्रथमच अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्यांचा ताफा मिळणार आहे.

सुरक्षा भागीदारीत भारत आणि जपानला सहभागी करणार का, या प्रश्नावर काल व्हाईट हाऊसमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना प्रवक्त्या जेन साकी यांनी म्हटले आहे की, अध्यक्ष बायडेन यांनी गेल्या आठवड्यात तीन देश वगळता या भागीदारीत कुणालाही सहभागी केले जाणार नाही, असे संकेत दिले होते. अमेरिकेने या भागीदारीतून फ्रान्सलाही वगळले आहे. त्याबद्दल फ्रान्सने टीका केली होती.

दरम्यान, अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया हे मोठे देश हिंद आणि प्रशांत महासागराच्या टापूतील आहेत. तसेच हिंद आणि प्रशांत हे आता अमेरिकेच्या दृष्टीने नवीन प्रभावक्षेत्र ठरत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews
Top