ठाणे : मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने आव्हाड यांना फोन करून धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आव्हाड यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून, संबंधित व्यक्तीचा व्हॉट्सॲप मेसेजही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
'घराच्या दरवाजावर उभा आहे', म्हणत धमकी
जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एका मोबाईल क्रमांकावरून त्यांना दोन ते तीन वेळा फोन करण्यात आला. फोनवरील व्यक्तीने अर्वाच्य भाषेत बोलत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. संबंधित व्यक्ती आपण आव्हाड यांच्या घराच्या दरवाजावर उभे असल्याचेही सांगत होती, असा दावा त्यांनी केला आहे.
या प्रकारानंतर आव्हाड यांच्या सुरक्षेबाबत आणि धमकीच्या गांभीर्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख आणि या कृत्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आव्हाड यांच्या कार्यकर्त्यालाही धमकी?
आव्हाड यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते हेमंत वाणी यांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्याचे वृत्त आहे. त्यावेळी त्या व्यक्तीने वाणी यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. 'आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुलाही गोळ्या घालेन,' असे संबंधित व्यक्तीने म्हटल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी हेमंत वाणी यांनीही पोलिसांत तक्रार दिली आहे.
धमकीमागील कारण अद्याप अस्पष्ट
जितेंद्र आव्हाड हे विद्यमान आमदार असून, यापूर्वीही त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, यावेळी धमकी देण्यामागे नेमके काय कारण आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. हा प्रकार राजकीय कारणातून घडला आहे की अन्य कोणत्या कारणामुळे, हे पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होईल.
दरम्यान, धमकी प्रकरणात अद्याप कोणाला ताब्यात घेतल्याची माहिती उपलब्ध नाही. धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवून पुढील कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

