Dailyhunt
To The Point: विधान परिषदेसाठी इच्छुक राष्ट्रवादीचे योगेश बहल, विलास लांडे, नाना काटे यांचा  भ्रमनिरास!

To The Point: विधान परिषदेसाठी इच्छुक राष्ट्रवादीचे योगेश बहल, विलास लांडे, नाना काटे यांचा भ्रमनिरास!

MahaeNews 2 weeks ago

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । राज्यातील रिक्त झालेल्या ९ विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. यापैकी ७ जागा भाजपा, १ शिवसेना आणि १ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या वाट्याला आली आहे.

राष्ट्रवादीतील १ जागेसाठी आठ-दहा नावे चर्चेत होती. या जागेवर पिंपरी-चिंचवडमधून शहराध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांपैकी एकाला संघी मिळेल, असे सांगितले जात होते.

दरम्यान, माजी शहराध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी एक शिष्टमंडळ तयार केले. चार दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी भेट घेतली. विधान परिषदेवर बहल यांना संधी मिळाली. त्यांनी सलगत सातव्यांदा महापालिकेत प्रतिनिधीत्व केले आहे, म्हणजे ३०-३५ वर्षे बहल नगरसेवक आहेत. पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची वर्णी लागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मात्र, पार्थ पवार यांनी विधान परिषदेवर झिशान सिद्धकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आणि पिंपरी-चिंचवडमधील बहल समर्थकांचा भ्रमनिरास झाला. आज सिद्धकी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

वास्तविक, पक्षातून अनेक जणांची नावे होती चर्चेत, परंतु मुंबईत पक्षाची ताकद वाढविण्याच्या झिशान सिद्दीकीला उमेदवारी देण्यात आली आहे. झिशान सिद्दीकी हे विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढले होते, परंतु शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार वरूण सरदेसाई यांनी त्यांचा पराभव केला होता. झिशान सिद्धकी हे आधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होते आणि मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते महाराष्ट्राचे माजी मंत्री स्वर्गीय बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती.

२०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत दाखल झालेल्या सिद्धीकी कुटुंबाला विधानसभेची उमेदवारी, त्यात पराभव झाल्यानंतर पुन्हा विधान परिषदेवर संधी देण्याची भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतली. मात्र, पक्षाच्या स्थापनेपासून दिवंगत अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांना संधी मिळाली नाही. योगेश बहल यांचा एक गट, काटेंचा एक गट आणि लांडे यांचा गट असे तीन गट शहर राष्ट्रवादीत आहेत. महापालिका स्वीकृत नगरसेवकपदावरुन अगोदरच नाराजीचा सूर असताना पुन्हा विधान परिषदेत डावलल्यामुळे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीतील अस्वस्थता वाढलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील काही नेते २०२९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट अथवा भाजपाशी जुळवून घेण्याबाबत चाचपणी करीत आहेत, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews