Vaibhav Sooryavanshi : सध्या क्रिकेट विश्वात एकाच नावाची चर्चा आहे ते म्हणजे वैभव सूर्यवंशी. त्याच्या वयाचा विचार करता फार कमी क्रीडापटूंना असं भाग्य लाभतं. सचिन तेंडुलकरच्या बाबतीत असा दुर्मिळ योग जुळून आलेला.
अगदी आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासून वैभव सूर्यवंशी हे नाव चर्चेत आहे. वैभव सूर्यवंशी टॅलेंटेड आहे यात शंका नाही. आज घराघरात या 15 वर्षाच्या मुलाची चर्चा आहे. प्रत्येक सामन्यात तो शतक, अर्धशतक झळकवत नाही. पण टीमला जी सुरुवात देतो, त्यातून त्याची प्रतिभा दिसून येते. या वैभवमुळे राजस्थान रॉयल्स टीमची या आयपीएलमध्ये जास्त चर्चा आहे. वैभवने यंदाच्या सीजनमध्ये अनेक सामन्यात राजस्थानच्या विजयाचा पाया रचला. राजस्थान रॉयल्सला आयपीएलच्या उद्घाटनाच्या पहिल्या सीजनमध्ये विजेतेपद मिळालं होतं.
त्यानंतर या टीमला पुन्हा विजेतेपद मिळालं नाही. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सारखा चाहतावर्ग या टीमला लाभला नव्हता. संजू सॅमसन आणि जोस बटलर सारख्या प्लेयर्समुळे राजस्थान रॉयल्सची चर्चा व्हायची. पण आता वैभव सूर्यवंशीने स्वत:साठी आणि या टीमसाठी अभूतपूर्व लोकप्रियता खेचून आणली आहे. आयपीएल 2024 च्या मेगा ऑक्शनमध्ये राजस्थान रॉयल्सने सूर्यवंशीला 1.1 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. त्या गुंतवणूकीवर टीमला आता डिविडंड मिळतोय.
समजा, जर पुन्हा ऑक्शन झालं, तर वैभव सूर्यवंशी हेडलाइन बनलेला असेल. तो आतापर्यंतच्या आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडूच ठरणार नाही, तर 30 कोटीच्या पलीकडे भाव मिळवणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरु शकतो. राजस्थान रॉयल्सच्या या पोस्टरबॉयबद्दल इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टूअर्ट ब्रॉडने काही गोष्टींची आठवण करुन दिली आहे. 'वैभव सूर्यवंशी हा तुमच्याशी कॉन्ट्रॅक्टने बांधलेला नाही. जेव्हा वेळ येईल, तेव्हा तो अन्य पर्याय शोधेल. यात त्याची क्षमता लक्षात घेतो तो मुंबई इंडियन्सकडून खेळू शकतो'
'ज्यावेळी ऑक्शनमध्ये त्यांनी वैभव सूर्यवंशीला करारबद्ध केलं, तेव्हा तो 14 किंवा 13 वर्षांचा होता. इतक्या लहान वयाच्या मुलाला घेण्याचा निर्णय मला थोडा विचित्र वाटलेला. ते तीन वर्ष वैभवला स्क्वाडमध्ये ठेवणार का? हा मला प्रश्न पडलेला. तुम्ही त्याला 10 वर्षासाठी करारबद्ध केलेलं नाही. ते मुंबई इंडियन्स किंवा दुसऱ्या फ्रेंचायजीकडून खेळू शकतो' असं ब्रॉड इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू जोस बटलरला 'फॉर द लव्ह ऑफ क्रिकेट'च्या पॉडकास्टमध्ये म्हणाला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

