डॉ. संदेश शहा, इंदापूर
वारकऱ्यांची आरोग्यसेवा हीच श्री विठ्ठलाची सेवा मानत गेली तब्बल २२ वर्षे देहू-पंढरपूर पालखी मार्गावर निःस्वार्थपणे वैद्यकीय सेवा देणारे रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे प्रकल्प संचालक संतोष राजगुरू यांचा निमगाव केतकी (ता.
इंदापूर) येथील ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे आणि बीड जिल्हा सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष किशोर राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार पार पडला. माजी पंचायत समिती सभापती दत्तात्रय शेंडे, केतकेश्वर यात्रा समितीचे सचिव मारुती घनवट, गजराज परिवाराचे संदीप भोंग तसेच उद्योजक माणिक भोंग यांच्या हस्ते राजगुरू यांचा सन्मान करण्यात आला.
राजगुरू गेल्या २२ वर्षांपासून रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करत आहेत. त्यांच्या पथकात दोन ॲम्बुलन्स आणि १४ सदस्यांचे वैद्यकीय पथक असून, हजारो वारकऱ्यांना वेळेवर उपचार आणि औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
यावेळी बोलताना संतोष राजगुरू यांनी या सेवेमागे रेड स्वस्तिक सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, डॉक्टरांचे, स्वयंसेवकांचे आणि औषधांसाठी मदत करणाऱ्या महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे राज्याध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच यंदाच्या पालखी सोहळ्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार राहुल कुल तसेच देहू संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन कार्याचे कौतुक केल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमास लक्ष्मण फरांदे, अक्षय चिखले, संतोष ननवरे, दीपक भोंग, सुनील मोरे, संतोष घनवट, ॲड. राजू भोंग, महेश जठार, धनंजय राऊत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया ही जागतिक स्तरावर आरोग्यसेवा देणारी संस्था असून, यंदा संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे.

