डॉ. संदेश शहा, इंदापूर देशातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या कोयंबतूर (तामिळनाडू) येथील आयसीएआर-शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट (SBI) मध्ये उभारण्यात येणाऱ्या 'ऊस उत्कृष्टता केंद्रासाठी' (Sugarcane Centre of Excellence) एकूण ९० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली.
कोयंबतूर येथे शास्त्रज्ञांसोबत झालेल्या विचारमंथन बैठका, प्रयोगशाळा भेटी आणि क्षेत्रीय पाहणीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आयसीएआर-एसबीआयचे संचालक पी. गोविंदराज, तामिळनाडू सरकारचे अतिरिक्त साखर आयुक्त अरुणराज तसेच इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) चे पदाधिकारी उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ आणि इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांच्या सहकार्याने या केंद्रासाठी साखर उद्योगाकडून ४५ कोटी रुपये आणि केंद्र सरकारकडून ४५ कोटी रुपये असा एकूण ९० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला जाणार आहे.
या उत्कृष्टता केंद्रातून नवीन ऊस वाणांचे संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, प्रात्यक्षिके आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कमी पाण्यात तग धरणारे, जास्त पर्जन्यमान, क्षारयुक्त जमीन व उष्ण हवामानाशी जुळवून घेणारे ऊस वाण विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच अधिक खोडवा उत्पादन, निविष्ठांचा कार्यक्षम वापर आणि इथेनॉल, बायो-सीएनजी व ऊर्जा निर्मितीसाठी उपयुक्त ऊस वाण विकसित करण्यावरही विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
देशातील साखर उद्योग ६ कोटींहून अधिक ऊस उत्पादक शेतकरी, सुमारे ५० लाख कारखाना कर्मचारी आणि १ कोटीहून अधिक हंगामी मजुरांच्या रोजगाराला आधार देतो. या उद्योगाची वार्षिक उलाढाल दीड लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक असून शासनाला १६ हजार कोटी रुपयांहून अधिक कर महसूल मिळतो, असेही पाटील यांनी नमूद केले.
उसाच्या वाढत्या तुटवड्यामुळे साखर कारखान्यांचा गाळप हंगाम १५० ते १६० दिवसांवरून सुमारे १०० दिवसांवर आला आहे. त्यामुळे उपलब्ध ऊस उत्पादन वाढविणे आणि अधिक उत्पादनक्षम वाण विकसित करणे ही काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात सुमारे दोन लाख शेतकरी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करत असून तामिळनाडूनेही अशा उपक्रमांचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.
आयसीएआर-एसबीआयचे संचालक पी. गोविंदराज यांनी सांगितले की, या निधीमुळे संशोधनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा अधिक सक्षम होतील. जनुकशास्त्र आणि जीनोम एडिटिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने रोगप्रतिकारक, हवामान बदलाशी सुसंगत आणि अधिक उत्पादन देणारे ऊस वाण विकसित करण्यासाठी संस्थेला मोठे बळ मिळणार आहे.
कोयंबतूर येथील आयसीएआर-शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट ही भारतातील ऊस संशोधनासाठीची सर्वात जुनी आणि अग्रगण्य संस्था असून तिची स्थापना १९१२ मध्ये झाली आहे. गेल्या ११० वर्षांहून अधिक काळात देशातील ऊस वाण विकासात या संस्थेने मोलाचे योगदान दिल्याचे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी काढले.

