Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आंतरजिल्हा जबरी चोरी टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक, दागिने व दोन दुचाकीसह ५.२० लाखांचा मुद्देमाल जप्त!

आंतरजिल्हा जबरी चोरी टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक, दागिने व दोन दुचाकीसह ५.२० लाखांचा मुद्देमाल जप्त!

सासवड (पुणे) : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि सासवड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील तिघांना अटक केली आहे. या कारवाईत जबरी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून, दोन मोटारसायकली आणि सुमारे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे २०२६ रोजी सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजकुमारसार विश्वनाथ होके यांच्या मावस बहिणीसोबत पाटरवाडी (ता. पुरंदर) येथील काळूबाई मंदिराच्या रस्त्याने जात असताना तीन अज्ञात इसमांनी त्यांना अडवून मारहाण केली. त्यानंतर महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज जबरीने लुटून आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, साक्षीदारांची चौकशी आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. घटनास्थळी कॅमेरे नसल्याने आरोपी ज्या मार्गाने मोटारसायकलवरून पळाले त्या मार्गावरील सुमारे ६५ किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तपासादरम्यान आरोपी पॅशन आणि सीडी डिलक्स या दोन मोटारसायकलींचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी फलटण येथे सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बाळू इश्वर माळी (वय ५२, रा. गिरवी नाका, फलटण), रोहित शिवाजी ननवरे (वय २८, रा. रविवार पेठ, फलटण) आणि दिलीप गोवर्धन माळी (वय ५५, रा. गोसावी गल्ली, फलटण) यांचा समावेश आहे.

चौकशीदरम्यान आरोपींनी सासवड येथील जबरी चोरीसह यवत पोलिस ठाण्यातील एक आणि लोणावळा शहर पोलिस ठाण्यातील एक अशा आणखी दोन जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यामुळे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली, तसेच साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तपासात आरोपी बाळू माळी याच्याविरुद्ध सातारा जिल्ह्यात दरोडा आणि जबरी चोरीचे दोन गुन्हे, तर आरोपी दिलीप माळी याच्याविरुद्ध सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात दरोडा आणि जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तेजस गोरें यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि सासवड पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे केली. गुन्ह्याचा पुढील तपास सासवड पोलीस करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live