बारामती : महान्यूज लाईव्ह
विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभागात कार्यरत प्राध्यापिका तथा संस्थेच्या माजी विद्यार्थिनी डॉ. क्रांती वाबळे सपकळ यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून संगणक शास्त्र विषयातील विद्यावाचस्पती (Ph.D.) ही सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आली आहे.
संगणकशास्त्र आणि शेती तंत्रज्ञानाच्या संगमावर आधारित त्यांच्या संशोधनाची शैक्षणिक व तांत्रिक क्षेत्रात विशेष दखल घेतली जात आहे.
डॉ. वाबळे यांनी "डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ फ्रेमवर्क फॉर एनालिसिस युजिंग आयओटी फॉर फार्मिंग इन पुणे रिजन" या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. पुणे विभागातील शेती व्यवस्थापन आणि आयओटी (Internet of Things) तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे शेती विश्लेषण अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेले संशोधन महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
या संशोधनासाठी चिखली येथील मार्गदर्शक डॉ. अविनाश कदम यांनी त्यांना मार्गदर्शन केले. शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी आणि डेटा-आधारित शेती व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. डॉ. क्रांती वाबळे सपकळ यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष अशोक प्रभुणे, सचिव ॲड. नीलिमा गुजर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, डॉ. लालासाहेब काशीद, संगणक विभाग प्रमुख डॉ. गजानन जोशी, पदव्युत्तर समन्वयक डॉ. जगदीश सांगवीकर, प्रा. किशोर ढाणे, डॉ. गौतम कुदळे, प्रा. महेश पवार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

